March 25, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बापरे… मुलांची विमानाने सहल घडविणाऱ्या गुरुजीवर ही काय वेळ आली

सोलापूर : जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलांना विमानाने सहल घडवून आणणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील गुरुजीवर अंगावरचा शर्ट काढून उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेचा कारभार हाकण्याची नव्याने जबाबदारी घेणारे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी शाळांना ज्ञानमंदिर बनविण्याचे घोषणा केलेली असतानाच जिल्हा परिषदेच्या गेट समोरच बुधवारी हे वाईट चित्र पहवयास मिळाले.

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी पदरमोड यांनी सलग दोन वर्ष विमानाने सहल घडवली होती. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात हा चर्चेचा विषय झाला होता. इतकेच नव्हे तर कर्नाटक शासनाने त्यांना आपल्या राज्यात बोलावून सन्मान केला होता. मुलांना विमानाची सहल घडविण्याबरोबरच शाळेचा पट वाढविण्यासाठी मुख्याध्यापक कट्टीमनी यांचा हात कोणी धरू शकले नव्हते. असे असताना तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्याविरुद्ध त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार अंगलट आली. अक्कलकोटचे गटशिक्षण अधिकारी परमेश्वर अरबळे यांनी विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरत शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या केल्याचा आरोप होता. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांच्या आदेशान्वये नेमलेल्या समितीने अरबळे यांच्यावर ठपका ठेवला. याचा राग काढत अरबळे यांनी मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्याविरुद्ध गटविकास अधिकाऱ्याकडे विनाचौकशी अहवाल सादर केला. त्यावरून गटविकास अधिकारी कवितके यांनी मुख्याध्यापक कटीमनी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास टाळाटाळ केली . कट्टीमनी यांनी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यांना परस्पर व्हाट्सअप वर आदेश टाकून दुसऱ्या शाळेवर नियुक्ती दिली. सुरक्षिततेच्या कारणास्तव मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी ह नवीन नियुक्ती अमान्य केली आणि गटशिक्षणाधिकारी अरबळे यांनी केलेल्या बेकायदेशीर कामाबाबत चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी गेले एक महिना जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.

अशातच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून दीपक वैद्य तर उपाध्यक्ष म्हणून इंद्रजीत पवार यांनी पदभार घेतला. अध्यक्ष वैद्य यांनी पदभार घेतानाच जिल्हा परिषदेच्या शाळा या ज्ञानमंदिर व्हाव्यात यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. असे असतानाच जिल्हा परिषद शाळेचा एक मुख्याध्यापक झेडपीच्या गेटवरच न्याय मागणीसाठी अंगावरील शर्ट काढून उपोषणाला बसल्यामुळे लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. राजकारण म्हणून एखाद्या अधिकाऱ्यांना किती पाठीशी घालणार?  असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत. शिक्षण अधिकारी काय करतात? असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे. हेच का तुमचे ज्ञानमंदिर? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या प्रश्नात हात टेकल्यामुळे आता पदाधिकाऱ्यांनाच यातून मार्ग काढावा लागणार आहे. पाहूया झेडपीचे अध्यक्ष दीपक वैद्य हे या शिक्षकाला आता कसा न्याय देतात ते…?