April 8, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपी अध्यक्षांना एसयूव्ही 700 तर सभापतींना स्कॉर्पिओ

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्या गाड्या घ्याव्यात, हा तिढा अखेर सुटला आहे. अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी चर्चा करून कोणत्या गाड्या घ्याव्यात हे निश्चित केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून दीपक वैद्य तर उपाध्यक्ष म्हणून इंद्रजीत पवार यांनी पदभार घेतला. त्यानंतर विषय समिती सभापतींची निवडही झाली. पण या पदाधिकाऱ्यांना गाड्या नव्हत्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना राखीव ठेवण्यात आलेली सफारी खूपच जुनी झाल्यामुळे त्यांनी पहिल्या दिवसानंतर ही गाडी वापरण्यास नकार दिला. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांना यापूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वापरलेली फोक्सवॅगन कार देण्यात आली. पण पवार यांनी ही गाडी स्वीकारली नाही. या दोन्ही गाड्या बसून असल्यामुळे खूपच जीर्ण झालेल्या आहेत. प्रशासक काळात नवीन पदाधिकाऱ्यांना गाडी घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीचे सभापती तसेच पाच पंचायत समितीच्या सभापतीनाही नवीन गाडी घेण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार कोणती गाडी घ्यावी असा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकाऱ्यांसमोर ठेवला. गाड्या खरेदीचा विषय अर्थ व बांधकाम विभागाकडे येत असल्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सर्वांशी चर्चा करून गाड्या घेण्याचे निश्चित केले आहे. यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांना ग्रामीण भागात जास्त काळ फिरत राहावे लागत असल्यामुळे महिंद्रा कंपनीची एसयुव्ही 700 ही गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विषय समितीच्या सभापतींच्या पसंती क्रमानुसार त्यांच्यासाठी महिंद्रा कंपनीच्याच चार स्कॉर्पिओ एन खरेदी करण्याचे ठरले आहे. तसेच पंचायत समिती सभापतीसाठी महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषद प्रशासन आता या नव्या गाड्या खरेदी करणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सभापतींसाठी नव्या गाड्यांचा ताफा जिल्हा परिषदेत येणार आहे.

पीएच्या विषयावर निर्णय नाही 

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना अद्याप पीए आलेले नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्याकडेही पीए दिलेला नाही. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले होते. त्यानुसार माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी पीएसह जिल्हा परिषदेच्या विविध विषयावर नुकतीच चर्चा झाली आहे. त्यानुसार लवकरच बदल दिसेल असे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले.

सदस्य निवडीवर आज बैठक 

जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सदस्य निवडीची विशेष सर्वसाधारण सभा 15 एप्रिल रोजी होणार आहे. विषय समितीचे सदस्य निवडण्याचे अधिकार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षनेत्या रश्मी बागल यांना दिले आहेत. त्यानुसार पक्षनेत्या बागल बुधवारी जिल्हा परिषदेत येणार असून अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्याशी चर्चा करून विषय समितीचे सदस्य फायनल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.