सोलापूर : प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी शहर व जिल्ह्यात तब्बल १४ ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याच वेळी इतर उपक्रमांचाही प्रारंभ होणार आहे. सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम आणि माणुसकीचा महोत्सव होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे तन्वीर शेख आणि राज सलगर यांनी दिली. या कार्यक्रमास मान्यवरांसह फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दिवसभरात सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध १४ ठिकाणी हे उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्यातील २०० विद्यार्थिनींना सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. अनाथ आश्रमासाठी ५० बेड देण्यात येणार असून, २०० महिलांना शिलाई मशीनचे वितरण करून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत केली जाणार आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विविध १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट बसविण्यात येणार आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड देण्यात येणार असून, १० शाळांमध्ये संगणक संच देऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात येणार आहे. याशिवाय सोलापुरात १०० ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याची पात्रे बसविण्यात येणार असून, त्याठिकाणी नियमित पाणी पुरवठाही केला जाणार आहे.
वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी तसेच मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कुंभारी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे बोअर मारून सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार असून ग्रामस्थांच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. तसेच कुंभारी येथील गेनसिद्ध देवालय येथे ५८.५ केव्हीए क्षमतेचा जनरेटर बसविण्यात येणार आहे.
आरोग्य उपक्रम राबवून मोठा दिलासा देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांसाठी विविध प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या या महाउपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनचे धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर, धीरज कारंडे यांनी केले आहे
वाढदिवस उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
– सोलापूर शहर-जिल्ह्यात १४ ठिकाणी एकाच दिवशी उपक्रम
– ५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किट करत गरजूंना थेट आधार
– शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर विशेष भर
– वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
– ३०० विद्यार्थी दत्तक , १ हजार बॅग, २०० मुलींना सायकली वाटप
– १०० मोफत शस्त्रक्रियाने गरीब रुग्णांना दिलासा
– २०० महिलांना शिलाई मशीन

More Stories
समाजकल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ
सोलापूर झेडपीत विरोधी पक्ष नेताच नसणार
झेडपी अध्यक्षांना एसयूव्ही 700 तर सभापतींना स्कॉर्पिओ