सोलापूर : रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सर्वांना दर्शन होईल, अशी व्यवस्था जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या सभेत 29 एप्रिल रोजी झालेल्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडील नवीन शासन निर्णय यांचे वाचन करण्यात आले. त्याचबरोबर मार्च 2025 च्या पंचायत समितीच्या हस्तांतर अभिकरण व सेस योजनांच्या जमाखर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर चौथ्या क्रमांकाच्या विषयामध्ये जिल्हा परिषद उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे चारही बाजूने भव्य व सुस्पष्ट दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सभापती इंद्रजीत पवार यांनी सूचना दिल्या. या सभेला जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, पुनम इंगवले, रेशमा डोके, केरप्पा पांढरे, वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे व संबंधित खाते प्रमुख उपस्थित होते. या सभेत रंगभवन चौकातील उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तीनही बाजूच्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना दर्शन व्हावे अशी व्यवस्था करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत रंगभवन चौकात अगदी मोक्याच्या ठिकाणावर असलेले हे उद्यान व त्या उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा लोकांच्या नजरेस पडत नाही. त्यामुळे या चौकातून येणाऱ्या जाणाऱ्यांना या बागेचे महत्त्व समजून येत नाही. सोलापुरात बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यानंतर जिल्हा परिषदेच्या या बागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती उभा पुतळा लक्षवेधी आहे. या पुतळ्याचे दर्शन येणाऱ्या जाणाऱ्यांना व्हावे, अशी व्यवस्था करण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे या उद्यानाचे महत्त्व आणखीन वाढणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची झाली होती उचलबांगडी…
रंगभवन चौकात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या उद्यानाचे महत्त्व मोठे आहे. या उद्यानाच्या मुख्य ठिकाणी असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकती पुतळा जिल्हाधिकारी निवासाच्या प्रांगणातून स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला शिवदर्शन असे नाव देण्यात आले आहे. तत्कालीन नवनियुक्त जिल्हाधिकारी सांगळे यांनी निवडणुकीची आचारसंहिता असताना तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील भगवा ध्वज उतरवण्याचे व या बंगल्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांची तात्काळ उचल बांगडी झाली होती.
शिवसेनेने केले होते आंदोलन…
रंगभवन चौकात असलेले हे उद्यान जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा उद्यानासाठी आरक्षित आहे. पण सन 2018 मध्ये या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याला शिवसेनेने विरोध करीत आंदोलन केल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.

More Stories
उच्च न्यायालयाचा निर्णय वेगळाच पण झेडपी प्रशासनाने वाढविला दबाव
आषाढी यात्रेच्या औषध खरेदीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणार
दिव्यांगासाठी लातुरात सेंसुरी पार्क मग सोलापुरात का नाही? आयुक्त सत्यजित बडे