सोलापूर : विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांचे हाल कसे असतात याची अनेक उदाहरणे आपणाला पहावयास मिळाली असतील. शासनाने शाळांना अनुदान देण्याचे धोरण अवलंबल्यावर असे अनेक प्रस्ताव शिक्षण विभागाकडून मंजूर झाले. पण बऱ्याच प्रस्तावात त्रुटी असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. या प्रस्तावातील त्रुटी दूर करताना शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. असाच किस्सा मंगळवारी सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात पाहावयस मिळाला. शिक्षक पत्नीचे उत्तर ऐकून क्षणभर शिक्षणाधिकारीही भावूक झाले.
कोर्ट कामकाजामुळे सोमवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना कोल्हापूरला जावे लागले. त्यामुळे मंगळवारी कार्यालय सुरू झाल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामासाठी झुंबड उडाली. शिक्षणाधिकारी जगताप यांनी रांगेने एकेकाचे म्हणणे ऐकून त्यावर निर्णय दिले. पंढरपूर तालुक्यातील एक महिला आपल्या पतीचा अर्ज घेऊन शिक्षणाधिकाऱ्यासमोर आली. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्रुटी काढल्याने त्या महिलेच्या पतीचा शालार्थ आयडी निघाला नव्हता. शालार्थ आयडी शिवाय पगार मिळत नसल्यामुळे ती अर्ज घेऊन आली होती. शिक्षणाधिकारी जगताप यांनी अर्ज पाहून लागलेच संबंधित क्लार्कला बोलावले व शिक्षण उपसंचालक आणि कढलेल्या त्रुटी तात्काळ दूर करण्याची सूचना केली. या शिक्षकाला मी ओळखतो. त्यांनी त्या शाळेवर काम केले आहे. त्या शिक्षकाचे काम झाले पाहिजे असे त्यांनी संबंधित क्लार्क ला बजावले व त्रुटी काढण्यासाठी संबंधित शाळेच्या प्राचार्यांना फोन करून पूर्तता करण्याची सूचना केली. ताई तुमचे आता काम होईल. तुम्ही कशाला आलात. सर कुठे आहेत? असा शिक्षणाधिकारी जगताप यांनी सवाल केला. त्यावर ती महिला म्हणाली सर, पगार नसल्यामुळे आमची परिस्थिती खूपच विदारक आहे. गाडी खर्चाला पैसे नव्हते म्हणून सर आले नाहीत. मला एसटीचे अर्धे तिकीट आहे. त्यामुळे मला यावे लागले. हे उत्तर ऐकून शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे क्षणभर भावूक झाले. त्यांना यावर काय उत्तर द्यावे हे क्षणभर कळेना. शेवटी त्यांनी शिपायाला बोलावून त्या महिलेस गाडी खर्चासाठी काही मदत करता येईल का? हे पाहण्यास सांगितले. माध्यमिक शिक्षण विभागात दररोज पदोन्नती, वेतनवाढ, पगाराचा फरक मिळवा म्हणून विनाकारण वाद घालणारे व गर्दी करणाऱ्यांची संख्या पाहता हे उदाहरण उपस्थितांना अंतर्मुख करणारे ठरले आहे.

More Stories
होय, गायरानावर अडकली गरिबांची घरकुले!
दक्षिण पंचायतीचे मनोज राऊत ठरले उपक्रमशील बीडीओ
झेडपीचे पदाधिकारी व विभाग प्रमुखांच्या तक्रारीची घेतली दखल