सोलापूर: समाजातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणीक, कायदेशीर, आरोग्य विषयक पुनर्वसनासंबंधी प्रश्नांचा विचार करून शासन आपल्या दारी अंतर्गत मिशन वात्सल्य योजना सुरु केली आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
दरवर्षी 23 जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन’ म्हणून पाळला जातो. समाजातील विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा त्यांना थेट लाभ मिळून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण व्हावे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, महिला बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, महिला बालकल्याण समिती सदस्य चैताली मुळे, करुणा शिवशरण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन विधवां संदर्भातील अनिष्ट प्रथा बंद करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या सर्व बाबींचा विचार करता, आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून आणि एकल महिला धोरण अनुषंगाने पुणे विभागातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर राबविणेबाबत विभागीय आयुक्त यांच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 23 जून 2026 रोजी खालीलप्रमाणे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत खालील बाबींचा समावेश आहे.
23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन सर्व ग्रामपंचायतीत साजरा करणे. सदर दिवशी विधवा दिनाची माहिती सांगणे. उपस्थित महिलांच्या आधार कार्ड, रेशन कार्ड, पेन्शन व इतर शासकीय कागदपत्रांमधील अडचणी समजून घेऊन, त्या निवारण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर त्वरित मदत करावी. ज्या महिला बचत गटात नाहीत, त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत (उमेद) बचत गटात सामावून घेण्यासाठी प्रेरित करावे.
महाराष्ट्र सरकार एकल महिन्ना धोरण जाहीर करत असल्यामुळे या धोरणात काय असावे याबाबत महिलांची मते समजून घेत त्या सूचना शासनास सादर करणे. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे आणि तिला शुभकार्यातून डावलणे यांसारख्या अमानवीय प्रथा पूर्णपणे बंद करण्याबाबत आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभांचे आयोजन करून ठराव मंजूर करण्याबाबत प्रोत्साहित करणे.
विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), उमेद (UMED MSRLM) आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने स्वयंरोजगार व कोशल्य विकास मार्गदर्शन मेळावे आयोजित करावेत. आपल्या तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या कामासाठी येणाऱ्या विधवा व एकल महिलांना प्राधान्याने आणि अत्यंत सन्मानाने वागणूक देण्याबाबत तालुकास्तशीय सर्व अधिकारी/कर्मचारी यांना सक्त सूचना निर्गमित कराव्यात. 23 जून रोजीच्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्यातील तहसिलदार/मुख्याधिकारी तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी यांचे उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच सर्व ग्रामपंचायत/नगरपंचायत कार्यालयात देखील वरीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करून सरपंच/नगराध्यक्ष यांना उपस्थित राहणेबाबत विनंती करावी. एकल महिलांच्या समस्यांचे निराकरण करावे. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांसाठी अल्पोपाहाराची आपलेस्तरावरून व्यवस्था करावी.

More Stories
मंत्री संजय शिरसाट यांच्या आश्वासनामुळे समाजकल्याण ठेकेदारांचे आंदोलन मागे
शिक्षणाधिकारी म्हणाले सर कुठे आहेत? “त्या’ म्हणाल्या एसटीला अर्धे तिकीट मीच आले..
झेडपीच्या छ. शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 2 कोटीचा आराखडा