सोलापूर: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दि. २२ ते २४ जुलै या कालावधीत शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
या उपक्रमांतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी अशा तीन गटांमध्ये करण्यात येणार आहे. स्पर्धांसाठी पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, स्वच्छ भारत, विकसित भारत २०४७, आषाढी वारी, सामाजिक समता आणि शाश्वत विकास हे प्रेरणादायी विषय निश्चित करण्यात आले आहेत.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय मूल्ये, सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना विकसित करणे हा आहे.
दि. २२ जुलै रोजी शाळास्तरीय स्पर्धा, तर २३ जुलै रोजी तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा व विद्यार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात दि. २४ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत शिक्षण विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

More Stories
सोलापूर जिल्हा परिषद पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश देशपांडे
अकलूज येथे नेत्रदीपक रिंगण सोहळा; हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथावर पुष्पवृष्टी