सोलापूर जिल्हा परिषदेत ‘कोहिनकर” पॅटर्नची अजूनही चर्चा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या कारकिर्दीची वर्षपूर्ती

सोलापूर : जिल्हा परिषदेत गेल्यावर्षभरात ‘कोहिनकर” पॅटर्नची चर्चा जोरात सुरू राहिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या कामकाजाला मंगळवार दि. 2 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोहिनकर यांची एक जानेवारी रोजी नियुक्ती झाली. त्यानंतर 2 जानेवारी 2023 रोजी त्यांनी पदभार घेतला. पदभार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली. ‘जनसेवा हीच ईशसेवा” या झेडपीच्या ब्रीद वाक्याला अनुसरून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. कामानिमित्त आलेल्या नागरिकांची थेट भेट घेऊन जागेवरच समस्या सोडवण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांच्या पॅटर्नची जिल्हाभर चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात नागरिकांचा दरबार वाढला. प्रशासकराज असल्याने त्यांनी नागरिकांसाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी पहिल्यांदाच लॉटरी पद्धत राबवली. शेतकऱ्यांना कृषी अवजारे सहजपणे उपलब्ध होण्यासाठी क्यूआरकोडचा अवलंब केला. बांधकाम व इतर विभागाचा निधी 100% खर्च होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा पदभार असताना घरकुल योजना मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यावर त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी पदाचा अतिरिक्त पदभार आला. या काळात त्यांनी जलजीवन विकास योजनेतील प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लावली. आषाढी यात्रेकाळात भाविकांच्या सोयीसाठी पालखी मार्गावर योग्य नियोजन केले. लंपीचा प्रादुर्भाव असताना पशुसंवर्धन विभागाचे योग्य नियोजन करून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. लोकप्रतिनिधींकडून आलेली प्रत्येक सूचना व कामांची यादी लक्षात ठेवून त्याचा पाठपुरावा करण्याची हातोटी असल्यामुळे सर्वांच्या कौतुकास ते पात्र ठरले आहेत. गतवर्षी मार्चअखेर झेडपीचे प्रशासकीय बजेट मांडण्याची संधी त्यांना मिळाली. सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व विभागाचा कारभार नेटका सुरू असल्यामुळे त्यांच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.