सोलापूर : अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सोलापुरात उत्साहचे वातावरण दिसून येत आहे घरावर दुकाने अपारमेंट वर भगव्या ध्वज फडकत असून अनेकांनी हा क्षण उत्सव म्हणून साजरा करण्याची तयारी केली आहे.
सोलापुरातील सर्वच मंदिरात पहाटेपासून महा अभिषेक भजन, कीर्तन व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मंडळातर्फे चौका चौकात स्पीकरवरून रामभजनाचे पारायण सुरू ठेवले आहे. सर्वच मंदिरावर भगवा ध्वज, पताका व मुख्य प्रवेशद्वारावर रामलल्लाची प्रतिकृती, प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढण्यात आल्याचे दिसत आहे. दुकाने व घराघरामधूनही उत्साह दिसत आहे. घरांवर भगवा ध्वज व गुढी उभारल्याचे दिसून येत आहे. प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे. सायंकाळी घरासमोर दीप प्रज्वलित फटाक्याची आतिषबाजी करून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. सर्वांमध्ये या क्षणाचा उत्साह दाटून आल्याचे दिसत असून सोलापूर राममय झाल्याचे चित्र आहे.