सोलापूर : जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना साने गुरुजींचा आदर्श सांगत फायनान्सच्याद्वारे लाखोच्या ठेवी स्वीकारून ‘नाणेगुरुजी” गायब झाल्याने मंद्रूप परिसरातील अनेक गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
मंद्रूप परिसरातील अनेक गुंतवणूकदार सध्या पोलीस ठाणे व उपनिबंधक कार्यालयाकडे हेलपाटे मारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचे कारण आहे या भागात प्रसिद्ध असलेले ‘नाणेगुरुजी”. जिल्हा परिषदेच्या शाळेत हे गुरुजीं नोकरी करत असतानाच त्यांना फायनान्सचा छंद जडला. या फायनान्सच्या माध्यमातून पिग्मीद्वारे ठेवी गोळा करून अनेकांना त्यांनी कर्ज देण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे शाळेबरोबरच छोटे व्यापारी, अडचणीत आलेले शेतकरी यांच्यात ते लोकप्रिय झाले. या माध्यमातून त्यांनी पुन्हा मित्र परिवारातून दाम दुप्पटचे अमिष दाखवत बेनामी ठेवी स्वीकारल्या. यातून त्यांची उलाढाल वाढत गेली व त्यांनी काहीना व्याजासह पैसेही परत केले. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. बक्कळ पैसा जमा झाल्यावर त्यांनी स्वतःसाठी माया जमविण्यास सुरुवात केली. जवळच्या नातेवाईकांसाठी पैसे गुंतवले. त्यामुळे साहजिकच पुन्हा त्यांच्या अडचणी वाढत गेल्या.
पिग्मी वसुलीला ‘नाणेगुरुजी” गायब झाल्यानंतर ठेवीदारांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जानेवारीपासून ठेवीदारांनी आपले पैसे काढण्यास सुरुवात केली. यामुळे अडचणी वाढल्यानंतर गुरुजींनी ठेवीदारांना थेट भेटणे बंद केले आहे. गुरुजी काही दिवस गायब झाल्यावर ठेवेदारांचा संशय वाढला आहे. त्यामुळे गुरुजींनी उडवा उडवीची उत्तरे सुरू केली आहेत. त्यामुळे आता ठेवीदार हातघाईवर आल्यावर गुरुजींनी त्यांना थेट हिशोब सांगितला आहे. ठेवी ठेवल्याचा पुरावा द्या, कोणाकडेही तक्रार करा, तुमचे निदान काहीही करून मुद्दल परत करेन अशी भाषा केल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. या ‘नाणेगुरुजीं”नी फायनान्सच्या माध्यमातून केलेले व्यवहार तरी कायदेशीर आहेत का? याबाबत आता लोकांना चिंता वाटत आहे. त्यामुळे मंद्रूप परिसरात ठेवीदारांमध्ये दबक्या आवाजात या गायब झालेल्या ‘नाणेगुरुजी” विषयी चर्चा सुरू आहे.
फायनान्सचे व्यवहार संशयास्पद
फायनान्सचा धंदा तोट्यात जात असल्याचे दिसल्यावर ‘नाणेगुरुजी” ने झेडपीत आपले भविष्य निर्वाह निधी व पेन्सिलचे खाते सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मंद्रूप परिसरात अशा बऱ्याच फायनान्सचा बेकायदा व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही दिवसापूर्वी एकाने औषधाचा जादा डोस घेण्याचा प्रयत्न केला होता. पण हे प्रकरण मिटवण्यात आल्याची चर्चा आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या परिसरातील अशा फायनान्सचे व्यवहार तपासून बेकायदेशीर कृती करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा मोठा आर्थिक घोटाळा होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.