सोलापुरात बारावीच्या इंग्रजी पेपरला 1019 विद्यार्थ्यांची दांडी
कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने ठेवली करडी नजर

सोलापूर : बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला 1 हजार 19 विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. दरम्यान कॉफी मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परीक्षा केंद्रावर करडी नजर ठेवल्याने परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या आहेत.
बारावीच्या परीक्षेला बुधवार दि. 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होता. बारावीच्या परीक्षेला 57,188 विद्यार्थी बसले आहेत. त्यापैकी पहिल्या पेपरला 56 हजार 169 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. 1019 विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत. 87 दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पोलीस व जिल्हा परिषद प्रशासनाच्या यंत्रणेची बैठक घेऊन नियोजन केल्यामुळे परीक्षा शांततेत सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद व महसूल विभागाची भरारी पथके तैनात करण्यात आल्याने जिल्ह्यात कोठेही कॉपीचा प्रकार झाला नसल्याचे सांगण्यात आले. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी मारुती फडके, प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली, नाळे, संजय जावीर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य नियंत्रण केले आहे.
असे आहेत परीक्षार्थी