सोलापूरराजकीय

४०० खासदारांमध्ये होणार राम सातपुते यांचा समावेश

आमदार रमेश पाटील यांच्या उपस्थितीत कोळी महासंघाने केला निर्धार

सोलापूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत. भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी केले. कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालय येथे मेळावा उत्साहात झाला.

यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, अरुण लोणारी, प्रकाश बोबडे, देवानंद भोईर, सतीश धडे, चंद्रकांत घोडके, शिवशंकर घुले, लक्ष्मण शिरसाट, विक्रम शिरसाट आदी उपस्थित होते.

आमदार रमेश पाटील म्हणाले, ऊसतोड कामगाराचा मुलगा राम सातपुते यांच्या रूपाने लोकसभेत निवडून जात आहे. आमदार राम सातपुते यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. भारताचे विकासपुरुष नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि ४०० खासदारांमध्ये राम सातपुते यांचा समावेश होण्यासाठी कोळी समाज बांधवांनी भाजपा आणि महायुतीची साथ द्यावी.

आमदार राम सातपुते म्हणाले, कोळी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. शासनस्तरावर प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. सोलापूरला २५ वर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कोळी समाज बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि महायुतीला साथ द्यावी, असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले.

अरुण लोणारी यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद सलगर यांनी सूत्रसंचालन तर महाराष्ट्र कोळी महासंघाचे सचिव सतीश धडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button