
सोलापूर : लेकीसाठी आई प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे चित्र सोलापूर लोकसभेच्या मैदानात दिसून आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर येथे सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ त्यांची आई व काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांनी गुरुवारी जाहीर सभा घेतली.
या सभेला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सोलापूर बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा- पाटील यांनी या सभेचे आयोजन केले होते. या सभेला माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उज्वलाताई म्हणाल्या की भाजपने कधी गोरगरिबाचा विचार केलाच नाही. दोन खासदार भाजपचे होऊन गेले. या खासदारांनी जिल्ह्य़ांसाठी काहीच केले नाही. यापूर्वीचे खासदार बनसोडे हे स्वतःच्या व्यसनामध्येच रममाण झाले तर दुसरे खासदार स्वामी यांनी स्वतःसाठी व मठासाठीच निधीचा वापर केला. राम मंदीरचे राजकारण मोदीबाबा करीत आहेत. ते ढोंगी आहेत. त्यांनी राष्ट्रपतीचा अपमान केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना त्यांनी विनाकारण अटक केली आहे. यापुढे पुन्हा ते सत्तेवर आल्यास काय होईल ते तुम्हीच विचार करा. प्रणिती ही या सोलापूरची लेक आहे. तिला निवडून द्या. तिचे वडील शिंदेसाहेब यांनी फार कष्ट केले आहेत. या कष्टकरी व पठ्ठेवाल्याची ती मुलगी आहे. सातपुते काय सांगतात तर मी उसतोड कामगाराचा मुलगा आहे. त्यांनी काय दिवे लावले आम्हाला माहीत आहे. माझी मुलगी प्रणिती ही कर्तबगार आहे. विधानसभेत तिने चांगले समाज उपयोगी काम केले आहे. ती खूप कष्ट करते. ती फटकून बोलत असली तरी लोकांची कामे करते.तिचे काम पाहून राहुल गांधी यांनी तिला लोकसभेचे तिकीट दिले आहे. तुम्ही तिला खासदार म्हणून निवडून द्या. ती तुमच्या विश्वासाचे चीज करेल, असा मला विश्वास आहे असे उज्वला शिंदे यांनी आवाहन केले.