पंढरपूर: उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने योजना शिक्षण संचालनालय आयोजित ‘वारी साक्षरते’ची या अनुषंगाने राज्यभर विविध उपक्रम सुरू आहेत. पालखी मार्गावरील माळशिरस तालुक्यात माळीनगर व वेळापूर येथे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत साक्षरतेचा जागर करण्यात आला. साक्षरता वारीत उपसंचालक क्षीरसागर, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्यासह उपस्थितांनी फुगडीच्या पारंपरिक खेळाचा आनंद घेतला.
सकाळी माळीनगर येथे मुख्य रस्त्यावर मॉडेल विविधांगी प्रशालेच्या बालचमूने बाळासाहेब सोनवणे, राजेश कांबळे, संजय बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षरता दिंडी काढली. राज्य योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे आणि साक्षरता रथातील सदस्यांचे स्वागत प्राचार्य कलाप्पा बिराजदार यांनी केले. साक्षरता दिंडीत शिक्षक, नागरिक, योजना संचालनालयाचा साक्षरता रथही सहभागी झाले.
गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका|,
वारीत भक्तीभावाने चालणार, गावी गेल्यावर मनोभावे शिकणार|,
अक्षर अक्षर गिरवूया, साक्षर भारत घडवूया| साक्षरतेकडून समृद्धीकडे| जन जन साक्षर|
अशा घोषणा देत दिंडीक-यांनी सर्वांचे लक्ष वेधले. केंद्र शासनाने दखल घेतलेल्या टोणेवाडी ता. बार्शी येथील सुशीला व रुचिता या आजी-नातीचे, सातारच्या बबई मस्कर यांची छायाचित्रे, रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण हिची कलाकृती,उल्लास कार्यक्रमाची माहिती व वैशिष्ट्ये साक्षरता रथावर दर्शवण्यात आली होती.
श्रीहरीनगर-माळीनगर येथे प्रशांत सरवदे यांनी भक्तीगीतांबरोबर साक्षरता गीते सादर केली. गेले सांगून ज्ञाना-तुका,झाला उशीर तरीही शिका..! अशी टॅगलाईन असलेली घोषणा तर सर्व वारकऱ्यांचे लक्ष वेधत होती.यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव, रितेश पांढरे, रणजीत लोहार, हरिदास शिंदे, करीम कोरबू, विनोद करडे, रामहरी वायचळ, पंजाबराव शिरसाट,नाना भोंग, सचिन दळवी, भीमराव चंदनशिवे, दगडू वाघमारे, कल्याण कापरे, मिलिंद गिरमे, शितल बिराजदार, संभाजी कांबळे, विलास शिंदे, विजय हेगडे, अण्णा शिंदे सहभागी झाले होते. प्रशालेच्या मैदानावर किशोरी चवरे, मनीषा नलावडे मेघा जोशी, आशा रानमाळ, रजनी चवरे यांनी ‘साक्षरता वारीची’ काढलेली मोठी रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
रथापुढील रथामागील व रतापुढील सर्व दिंड्यांमधील वारकऱ्यांसह सर्वांचे स्वागत घोषणा व साक्षरता गीतांनी झाले. तालुक्यातील विविध शाळांमध्ये बाल वारकऱ्यांची साक्षरता दिंडी निघाली. यामध्येही साक्षरतेच्या घोषणा, साक्षरता गीते यांचा समावेश होता. विशेषता पालखी मार्गावरील शाळांमधील उत्साह वाखण्याजोगा होता. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या माहितीपत्रक (घडीपत्रिका)चे वाटप करण्यात आले.रमेश कवितके, लव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तर संभाजी देशमुख, कापसे यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर रथाद्वारे साक्षरतेचा जागर केला.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथामागील दिंडी क्रमांक २७९ ते ३७८ या दिंड्यांमधील असाक्षर वारकऱ्यांची नोंदणी अकलूज व माळीनगर परिसरातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी दिंडीत मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन केली. दुपारी वेळापूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेसमोर उपसंचालक राजेश क्षीरसागर शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या समावेत स्वयंसेवकांनी उल्लास माहितीपत्रकांचे वाटप केले. उल्लास नव भारत कार्यक्रमासाठी शर्ट घातलेले स्वयंसेवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. येथे प्रसिद्ध असलेल्या उतारावर वारकऱ्यांना समावेत उल्हासच्या स्वयंसेवकांनी ‘धावा’ केला.
दोन्ही प्रमुख पालखी मार्गावर साक्षरतेच्या रथाद्वारे जागृती करण्यात येत आहे. तसेच असाक्षर नोंदणी करण्यात येत आहे. पंढरपूर येथे आषाढी वारीपर्यंत ही जागृती सुरू ठेवण्यात येईल. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या असाक्षर वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-राजेश क्षीरसागर, राज्य शिक्षण उपसंचालक (योजना) पुणे.