सोलापूर : दोन जाधव गुरुजींनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची झोप उडवली आहे. एक जाधव गुरुजी नीट परीक्षा घोटाळ्यात तर दुसरा जाधव गुरुजी फायनान्स घोटाळ्यात अडकला आहे.

नीट परीक्षा घोटाळा देशभर गाजला. अजूनही याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात सोलापूर झेडपी शाळेच्या जाधव गुरुजीला अटक झाली. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग चर्चेत आला. कोकणातून सोलापूर जिल्हा परिषदेकडे बदलून आलेल्या या शिक्षकाची करामत सर्वांनाच धक्का देणारी ठरली. या प्रकरणाची चर्चा थांबते न थांबते तोच मंद्रूप जिल्हा परिषद शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी जाधव याला बँक घोटाळ्यात अटक करण्यात आली. जाधव निवृत्त झाले असले तरी या प्रकरणाची सुरुवात ते शाळेवर असतानाच झाली होती. प्रकरण अंगलट येत आहे हे पाहून या जाधव गुरुजींनी आधीच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उरकला. सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन व देय रकमासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे लकडा लावला. पण सेवालाल निधी बँकेचे ठेवीदार वस्ताद निघाले. ठेवीदारांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. त्यावर जाधव गुरुजींनी हात वर केले. माझा या बँकेची काहीच संबंध नाही असे त्यांनी शिक्षण विभागाकडे म्हणणे मांडले. त्यावर ठेवीदारही पुढचे निघाले. ठेवीदारांनी ठेव प्रमाणपत्र व रकमा भरलेल्या पावतीसह पुरावे सादर केले. पावतीवर गुरुजीचे हस्ताक्षर निघाले. त्यामुळे गुरुजीने ठेवीदारापुढे जे बुद्धी चातुर्य दाखवले त्या गणितात ते नापास झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने जाधव गुरुजीच्या देय रकमा स्थगित ठेवल्या.

जाधव गुरुजींनी झेडपीकडून पैसे यायचेत तुम्हाला देतो असे अनेकांना आश्वासन दिले होते. पण झेडपीने इंगा दाखवल्यावर गुरुजींचा नाईलाज झाला आणि ते जाळ्यात अडकत गेले. सेवानिवृत्ती होईपर्यंत गुन्हा दाखल होऊ न देण्याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. सेवानिवृत्तीचे लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. शेवटी गुरुजी घोटाळ्यात अडकले व पोलिसांनी त्यांना अटक केली. 50 हजाराची दाखल झालेली फिर्याद आज दोन कोटीवर गेली आहे. आतापर्यंत 25 जणांनी  तक्रारी दाखल केल्या असून  न्यायालयाने जाधव गुरुजीला चार वेळा पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात जाधव गुरुजी व त्याच्या मुलाला अटक झाली आहे. इतर संचालक अद्याप गायब आहेत. या घोटाळ्याचा आकडा आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे. जाधव गुरुजीच्या घोटाळ्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडे लेखी तक्रारी आल्यानंतर शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी चौकशीबाबत पुरेपूर खबरदारी घेतल्याचे कार्यालयीन अधीक्षक होळकर यांनी सांगितले.

जाधव गुरुजीच्या घोटाळ्याचे किस्से अजून वाचत राहा फक्त “सोलापूर समाचार’ वर…      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *