सोलापूर : संतप्त झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने गटशिक्षणाधिकाऱ्यांवरच हात उचलण्याची घटना एका तालुक्यात घडली आहे. इतर शिक्षकांनीही “या’ शिक्षकाच्या कृत्याला पाठिंबा दिल्याने “परमेश्वर’ कृपेने हे प्रकरण शांत झाल्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षण वर्तुळात चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाने प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गेल्या महिन्यात समुपदेशाने शिक्षकांच्या विनंती बदल्या व मुख्याध्यापक पदोन्नती केली. पदोन्नती झालेल्या शिक्षकांचे आदेश उशिरा तालुक्यापर्यंत पोहोचवण्यात आले. यानुसार संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पदोन्नती झालेल्या शिक्षकांना त्यांच्या शाळावर हजर राहण्याचे आदेश देणे अभिप्रेत होते. पण एका तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्याने संबंधित शिक्षक भेटीचा “प्रोटोकॉल’ ठेवला. त्यामुळे पदोन्नतीचा आदेश मिळेल या आशेवर अनेक शिक्षक वाट पाहत होते. पण या गटशिक्षणाधिकाऱ्याने अनेकांना वेटिंगवरच ठेवले. शाळा भेटी दरम्यान एका शिक्षकांबरोबर या गटशिक्षणाधिकार्याने विनाकारण वाद घातला. तालुक्यात या शिक्षकाचे काम चांगले असल्याने सर्वांचे पाठबळ आहे. असे असताना या गटशिक्षणाधिकार्याने काही शिक्षकांच्या तक्रारी घेऊन “त्या’ शिक्षकाविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव ठेवला. ही बाब समजल्यावर “त्या’ शिक्षकाने संतापून गटशिक्षणाधिकाऱ्याला जाब विचारला. त्यावेळी संबंधित गटशिक्षणाधिकार्याने अरेरावीची भाषा केल्यावर “त्या’ शिक्षकाचाही तोल सुटला. ते शिक्षक चक्क “त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. इतर शिक्षकांनी त्यांना आवरले नाही तर “त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याच्या कानशिलातच बसली असती, त्याच्यावर “परमेश्वराचीच’ कृपा झाली अशी चर्चा “त्या’ तालुक्यात सुरू आहे. या प्रकरणानंतर “त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्यांनी “त्या’ शिक्षकावर कारवाईची फाईल पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. पण “त्या’ तालुक्यातील इतर शिक्षकांनी “त्या’ शिक्षकाची बाजू उचलून धरल्याने “त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याचा नाईलाज झाल्याची खुमारसदार चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतानाच कामात हयगय करणाऱ्याची काही खैर नाही असा इशारा दिला होता. पण या इशाराला न जुमानता “या’ गटशिक्षण अधिकाऱ्याने त्याच्या तालुक्यात अनेक भानगडी गेल्याची चर्चा आहे. यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. “त्या’ तालुक्यात शिक्षकांचे प्रशिक्षण झाले आहे. त्यात शिक्षक किती हजर होते? प्रशिक्षण कोठे झाले? दिव्यांग शिक्षक किती प्रत्यक्षात हजर होते? प्रशिक्षणासाठी जेवण किती दिले आणि त्यावर खर्च किती झाला? याची चौकशी व्हावी अशी मागणी “त्या’ तालुक्यातील शिक्षकांनी केली आहे. याबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी “त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल कॉल रिसीव्ह केला नाही.