सोलापूर जिल्ह्यात रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर लावण्याचे दिवस कोणते?

सोलापूर : महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक : ध्वनीप्र-2009/प्र.क्र. 12/08/तां.क. 1 दिनांक 22 ऑगस्ट, 2017 अन्वये, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या परिच्छेद 5(2) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर रात्री 10 वा. पासून सकाळी 6 वाजेपर्यंत करता येत नाही. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाने दि. 10 ऑगस्ट, 2017 रोजी ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2017 सुधारित अधिसूचना निर्गमित केलेली असून सदर अधिसूचनेन्वये नियम 3 मध्ये उपनियम (5) व नियम 5 मध्ये उपनियम (3) मध्ये सुधारणा केली आहे. आता नियम 5 मधील सुधारित उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर वर्षातील 15 दिवसांसाठी (श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा वगळून) ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करण्याकरिता वर्षभरातील 15 दिवस कोणते हे ठरविण्याची जबाबदारी संबंधित राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या जिल्हा प्राधिकरणाची असल्याने ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सूट देण्याबाबत जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केले आहेत.
महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक : ध्वनीप्र-2009/प्र.क्र. 12/08/तां.क.1 दिनांक 22 ऑगस्ट, 2017 अन्वये, केंद्र शासनाच्या दि. 10/08/2017 रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षांमध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी जा.क्र. विशा-2/विशेष दिन/4695/2024 दिनांक 11/12/2024 व पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडील पत्र जा.क्र. जिविशा/सण उत्सव/2025-माहिती/2024-14179 दि. 23/12/2024 अन्वये, सन 2025 या वर्षातील 15 दिवस येणारे सण/उत्सव/विशेष दिना दिवशी सकाळी 6.00 ते रात्री 12.00 पर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराकरिता परवानगी देण्याबाबत अहवाल सादर केलेला आहे.
जिल्हाधिकारी कुमार अशीर्वाद यांनी ,ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, मध्ये दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही, तसेच मा. उच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही या अटीस अधिन राहून, शासनाच्या दि.22 ऑगस्ट. 2017 शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारान्वये सोलापूर जिल्ह्यात सन 2025 वर्षातील 15 दिवस खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या सण/उत्सव/विशेष दिना दिवशी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराकरिता सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत (शांतता क्षेत्र वगळून) सुट जाहिर केली आहे.
मकरसंक्रांत / श्री.सिध्दरामेश्वर यात्रा – 14 जानेवारी 2025 एक दिवस.
शिवजयंती – 19 फेब्रुवारी 2025 -1 दिवस
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व मिरवणूक सांगता – 20 एप्रिल 2025- 1 दिवस
गणपती उत्सव – पहिला दिवस 27 ऑगस्ट. 2025
गणपती उत्सव व ईद ए मिलाद – दहावा दिवस – 05 सप्टेंबर 2025
गणपती उत्सव अनंत चतुर्दशी- 06 सप्टेंबर 2025
नवरात्री उत्सव (अष्टमी)- 30 सप्टेंबर 2025, एक दिवस व (नवमी) 01 ऑक्टोबर 2025 एक दिवस
दिपावली (लक्ष्मीपूजन) 21 ऑक्टोबर 2025 – एक दिवस. ख्रिसमस – 25 डिसेंबर 2025 एक दिवस.
उर्वरीत 5 दिवस महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार देण्यात येईल.सदरचा आदेश हा सोलापूर जिल्ह्याचे हद्दीत लागू राहील.