बोटाचे ठसे उमटवून काढता येणार पोस्ट बँकेतून पैसे

सोलापूर : भारतीय टपाल बँकेने सेवेत अत्याधुनिकता आणत ई केवायसीद्वारे आता ग्राहकांना केवळ बोटाचा ठसा उमटवून पैसे भरणे व काढण्याची सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
पोस्ट खात्याने सुरू केलेल्या “स्मार्ट पोस्ट ऑफिस- स्मार्ट ग्राहक’ योजनेबाबत माहिती देताना प्रवर डाक अधीक्षक के. नरेंद्र बाबू म्हणाले की, भारतीय डाक विभागाने ई केवायसीआधारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ग्राहकांना एकल पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खाते उघडणे व व्यवहार करणे सोपे व सुरक्षित होणार आहे. हे खाते उघडण्यासाठी पहिल्या टप्प्यात ग्राहकांना आधार व बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून त्यांचे पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक एकल खाते उघडता येणार आहे. या खात्यात कितीही रक्कम भरण्यासाठी व पाच हजार रुपये काढण्यासाठी केवळ खाते क्रमांक व बोटाचे ठसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांची सही न जुळणे व अयोग्य व्यक्तीला पैसे न जाणे या कटकटी राहणार नाहीत. पोस्ट खात्याच्या या नव्या डिजिटल उपक्रमामुळे ग्राहकांचे खाते अधिक सुरक्षित होणार आहे. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मातृवंदन योजना यासाठी पोस्ट बँकेत खाते उघडलेल्यांना थेट फायदा होणार आहे. हेच खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला जोडल्यास घरबसल्या पैसे काढणे, पैसे जमा करणे, खात्याचे तपशील मिळवणे सोपे होणार आहे. या नव्या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयात भेट द्यावी असे आवाहन प्रवर अधीक्षक बाबू यांनी केले आहे.