तडवळला यात्रा नसताना झेडपी शाळेला सुट्टी देऊन गुरुजी गेले वास्तुशांतीला

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अनेक किस्से चर्चेला येत आहेत. प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्याच्या पराक्रमानंतर आता तडवळ जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी भलताच विक्रम केला आहे. तडवळची यात्रा असल्याचे रेकॉर्डवर दाखवून शाळेला सुट्टी देऊन आदर्श शिक्षकाच्या वास्तुशांतीला सोलापूरला हजेरी लावल्याचा प्रकार सरपंचांनी उघड केला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ जिल्हा परिषद मराठी, कन्नड शाळेला सोमवारी सुट्टी असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या घरी सांगितले. सोमवारी शाळेला सुट्टी कशाची? असा पालकांना प्रश्न पडला. ग्रामपंचायतीत याची चर्चा झाल्यावर थेट सरपंच, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष चौकशीसाठी शाळेत दाखल झाले. पण शाळेला कुलूप लावून मुख्याध्यापक व इतर शिक्षक पसार असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी सोमवारी अचानकपणे शाळेला सुट्टी दिल्याने सरपंचासह पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सरपंचांनी याबाबत अधिक चौकशी केल्यावर शिक्षकांनी बनवाबनवी केल्याचे दिसून आले. तडवळला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा असून मराठीची पहिली ते चौथी आणि कन्नड माध्यमाची पहिली ते सातवी वर्ग आहेत. या ठिकाणी बारा शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाने या शाळेतील एका शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे. याच शिक्षकाने सोलापुरात नवे घर बांधले असून त्याची सोमवारी वास्तुशांती होती.
या वास्तुशांतीसाठी प्रत्येक शिक्षकाला या कार्यक्रमासाठी जाणं अनिवार्य वाटत होतं, पण काय करावे? असा प्रश्न सगळ्यांसमोर होता. केंद्र प्रमुखांच्या सल्ल्याने या शिक्षकांनी चांगलीच शक्कल लढविल्याचे सांगण्यात आले. शालेय समितीच्या अध्यक्षाला वेगळेच कारण सांगून सही घेण्यात आली आणि तडवळ गावची यात्रा असल्याने सोमवारी शाळेला सुट्टी देण्यात येत असल्याचे रेकॉर्डवर दाखवले. सरपंचाच्या चौकशीने या युक्तीचे बिंग फुटले. चक्क केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या संगनमतानेच ही बनवाबनवी झाल्याचे समोर आले आहे. शिक्षकांच्या या कारनाम्याच्या चौकशीसाठी सरपंच शाळेत हजर झाल्यावर पालकासह तंटामुक्त अध्यक्ष आणि शालेय समितीचे अध्यक्ष यांनी या बनवाबनवी बाबत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
गावातील यात्रा किंवा एखाद्या घटनेबाबत शाळेला सुट्टी देण्याचा मुख्याध्यापकाला अधिकार देण्यात आला आहे. या अधिकाराचा फायदा घेत चक्क मुख्याध्यापकाने गावची यात्रा नसताना यात्रा असल्याचे दाखवून आदर्श शिक्षकाच्या वास्तुशांतीला हजेरी लावली. इतकेच नव्हे तर वास्तुशांतीचा थाट झाल्यानंतर या शिक्षकांना सोलापूरच्या गड्डा यात्रेत फेरफटका मारण्याचा मोह आवरला नाही. गड्डा यात्रेतले फोटो या शिक्षकांनी आपल्या मोबाईलचे स्टेटसवर ठेवल्यानंतर गावकऱ्यांना कोणत्या यात्रेसाठी या शिक्षकांनी शाळेला सुट्टी दिली असा प्रश्न पडला. या प्रकाराने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बदनामी झाली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक, शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.