March 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

तडवळच्या “त्या’ गुरुजींचे चौकशीचे आदेश

सोलापूर : तडवळ गावची यात्रा असल्याचे रेकॉर्डला दाखवून सोलापूरला आदर्श गुरुजीच्या वास्तुशांतीला हजेरी लावणाऱ्या तडवळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व 10 शिक्षकांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी परमेश्वर आरबळे यांना दिले आहेत.

तडवळ जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षकाने सोमवार दि. 20 जानेवारी रोजी सोलापुरात नव्याने बांधलेल्या घराची वास्तुशांती ठेवली होती. या कार्यक्रमाला जायचे होते. त्यामुळे या शिक्षकांनी शालेय समितीच्या अध्यक्षाच्या सहीने चक्क गावात यात्रा असल्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरी घेतली. सोमवारी शाळेला गेलेली मुले घरी परतली. शाळेला सुट्टी दिली असल्याचा सांगावा घेऊन मुले घरी परतल्याचे पाहून पालकांना अचंबा वाटला. पालकांनी ही बाब सरपंचाच्या कानावर घातली. सरपंच, शालेय समितीचे अध्यक्ष व पालक शाळेत गेल्यावर त्यांना कार्यालयाला कुलूप दिसले. सरपंचांनी भ्रमणध्वनीवरून मुख्याध्यापकांना संपर्क साधल्यावर वर्षातून दोन वेळा यात्रा किंवा अन्य कारणाने शाळांना अशी सुट्टी देण्याचे मुख्याध्यापकाला अधिकार आहेत. मार्च अखेर या सवलतीची सुट्टी वाया जाणार असल्याने तसा प्रस्ताव तयार करून मंजुरी घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. मुख्याध्यापकांच्या या स्पष्टीकरणावर पालक संतप्त झाले व त्यांनी घडल्या प्रकाराबाबत गटशिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी या सुट्टी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी परमेश्वर आरबळे यांना मंगळवारी तडवळ शाळेला भेट देऊन घडल्या प्रकाराची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरबळे यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिक्षकांनी यात्रा असल्याचे सांगून सुट्टी घेतल्याचे पालकांना चांगलेच खटकले आहे. मंगळवारी काही पालकांनी शिक्षकांना जाब विचारत शाळेत ठिय्या मारला होता. वास्तुशांती करणाऱ्या शिक्षकांनी रजा घेतली होती तर या कार्यक्रमाला हजर राहणारे शिक्षक आता चांगलेच अडचणीत आले आहेत.