सोलापूर : मोठी माणसे खरेच मनानेही मोठी असतात असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेत सोमवारी घडलेल्या एका किश्यामुळे सर्वांना अनुभवता आला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून सर्वांसमोर आदर्श ठेवल्याने आता हा विषय सर्व पालकांमध्ये चर्चेचा झाला आहे.

आपल्या विमानाची सहल हुकली म्हणून अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या मुली पालकांसह सोमवारी जिल्हा परिषदेत आल्या होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना भेटून आपली कैफियत त्यांना मांडायची होती. पण सीईओ जंगम कार्यालयात नाहीत म्हणून कंटाळलेल्या पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांचे केबिन गाठले. शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी महिला पालकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यावर पालकांनी आमच्या मुलीनाही भेटायचे आहे, त्यांच्या तोंडून तुम्ही कैफियत ऐकून घ्या असा आग्रह धरला. पण निवेदनातील मागणी पाहून शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यांची भेट टाळून आल्या पावली परत पाठवले. खरंतर जिल्हा परिषदेच्या शाळेचे हे विद्यार्थी. शाळेतून ते आपल्या कार्यालयात कशासाठी आले असतील याचे कुतूहल म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्या होत्या. त्यांना कोणतेही अपराधीपणाची भावना जाणू नये यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांचे कर्तव्य त्यांनी पालन करणे अपेक्षित होते. मुलं ही फुलं असतात याप्रमाणे शिक्षण दिलं जातं. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही मुलं फार आवडत. त्यामुळे कायद्यातही बालकांचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. पण शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारला. पण पालकात्वाची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जपल्याचे नंतर दिसून आले. सीईओ जंगम यांनी पालकांची भेट घेतली व त्यांच्या तोंडून कैफियत ऐकली. काही काळजी करू नका, मी काय ते पाहीन असा शब्द दिल्यावर त्या महिला पालकांना कोण आनंद झाला. जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेच्या या विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या मातानाही मराठी येत नव्हती. त्यातील एका मातेने तेलुगुमधून संवाद साधल्यावर सीईओना खरी हकीकत कळाली. त्यांनी सर्वांच्या भावना जाणून घेतल्यावर त्या मातांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर दिसून आली.

विशेष म्हणजे याच विद्यार्थिनी आपली कैफियत मांडण्यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडेही मातांसह धाव घेतली होती. खरे तर आमदार कल्याणशेट्टी हेही एक शिक्षकच आहेत. गणवेशात आलेल्या या छोट्या विद्यार्थिनीना  पाहून लागलीच त्यांनी चॉकलेट्स मागविली. काळजी करू नका सर्व ठीक होईल असे त्यांनी सांगितल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला. एक शिक्षक व एक लोकप्रतिनिधीची भूमिका त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्याचे दिसून आले. एकीकडे शिक्षणाधिकाऱ्यांच्या वागण्याबाबत नापसंती व्यक्त होत असतानाच दुसरीकडे या दोन मोठ्या व्यक्तीमत्वाचे मोठेपण चर्चेत आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *