निवडश्रेणी मान्यतेसाठी 20 हजाराची लाच घेताना माध्यमिकमधील लिपिक मस्केला अटक

सोलापूर : एका शिक्षकाच्या निवडश्रेणी मान्यतेसाठी 40 हजार लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून वीस हजार रुपये घेताना माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम अंकुश मस्के (वय 43, रा. प्लॉट नंबर 33, मेरगू अपार्टमेंट, अक्कलकोट रोड सोलापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी रंग हात अटक केली.
याबाबत एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. संबंधित शिक्षकाची सेवा 24 वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे त्या शिक्षकाला निवड श्रेणी मिळणार होती. निवड श्रेणी मिळण्याकरता त्यांनी रीतसर माध्यमिक शिक्षण विभागात 25 ऑक्टोबर 2023 रोजी प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ सहाय्यक मस्के यांच्याकडे आला होता. प्रस्ताव तपासून वरिष्ठांकडे मान्यतेसाठी पाठवण्यासाठी मस्के याने चाळीस हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंति बत्तीस हजार देण्याचे ठरले. यातील पाच हजार रुपये त्याने पूर्वीच घेतले होते. त्यानंतर पहिला हप्ता म्हणून वीस हजार देण्याचे ठरले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी खातरजमा केली. त्यानंतर गुरुवारी माध्यमिक शिक्षण विभागात सापळा लावला. दुपारी त्या शिक्षकाकडून 20 हजाराची लाच घेताना वरिष्ठ सहाय्यक मस्के याला लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.