सोलापूर : काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीकडे कामे घेऊन येणाऱ्या नेत्यांना रांगेत या… असे उत्तर मिळत असल्याने अनेकांनी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिंदे सेनेच्या गोटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे तर माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे हेही काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अनेक नेतेमंडळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याने काँग्रेसला मोठा फायदा झाला. सोलापूर लोकसभेची गेलेली सीट काँग्रेसला मिळाली. पण विधानसभा निवडणुकीला हे चित्र बदलले. त्यानंतर अलीकडच्या काळात काँग्रेस नेत्यांची मोठी घुसमट सुरू झाली. भाजप- शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना कामे मिळेनाशी झाली. त्यामुळे कार्यकर्ते सांभाळताना नेत्यांची गोची होऊ लागली. याबाबत अनेक नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटले. पण काहीच उपयोग न झाल्यामुळे हळूहळू काँग्रेसमधून गळती सुरू झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसने कोणती भूमिका घ्यावी याबाबतही मार्गदर्शन घेण्यात आले पण तुमचे तुम्ही पहा, असे उत्तर आल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपशी जवळीक केली. त्यानंतर काही नेते काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींच्या भेटीला आले. त्यावेळी त्यांनी या नेत्यांना रांगेत या, असे उत्तर पाठविले. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी इतर पक्षाकडे रांग लावण्यास सुरुवात केली आहे.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन शिंदे सेनेबरोबर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 31 मे रोजी जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हेत्रे यांच्या या निर्णयामुळे अक्कलकोटच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या म्हेत्रे यांनी शिंदे सेनेचा रस्ता धरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडे मातब्बर नेताही नसल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी यापूर्वी म्हेत्रे यांच्याबरोबर माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे इच्छुक होते. पण पक्ष निरीक्षकानी मते जाणून घेतल्यानंतर यापैकी कोणीही या पदाला संमती दिली नसल्याने काँग्रेस श्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
आतातर म्हेत्रे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर बाजार समितीच्या निवडणुकीपासून माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे हेही काँग्रेसपासून अलिप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच तेही भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठी घरघर लागली आहे. काँग्रेसचे नेतृत्व संपविण्यात भाजप व शिंदे सेनेचे डावपेच यशस्वी होताना दिसून येत आहेत.
कल्याणशेट्टी यांना बसेल का धक्का?
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष नुकतेच दुसरीकडे गेले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांना बरोबर घेऊन चांगले यश मिळवले. मात्र याचवेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख हे कल्याणशेट्टीच्या धोरणाच्या विरोधात दिसले. त्यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी जवळीक करीत तीन संचालक निवडून आणण्यात यश मिळवले. आता म्हेत्रे हे शिंदे सेनेच्या गटात सहभागी होत आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुढील विधानसभा निवडणुकीत या देशमुख यांनी मैत्रीचा हा धर्म जपला तर कल्याणशेट्टी यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून आत्ताच बोलले जात आहे. इकडे म्हेत्रे यांच्या निर्णयावर कार्यकर्ते खुश झाले आहेत. सत्तेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांना कोणतीच कामे मिळत नव्हती. याशिवाय कार्यकर्त्यांच्या कामाला अडसर आणला जात होता. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची साथ मिळणार असल्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे म्हेत्रे यांचा हा निर्णय कार्यकर्त्यांना संजीवनी देणारा तर आगामी काळात राजकीय धक्का देणारा ठरणार आहे.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की