सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

झेडपीत गोंधळ करणाऱ्या शिक्षकांनी फिरवली संवाद दिनाकडे पाठ

सोलापूर : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षण अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दरवाजावर गोंधळ करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक संवाद दिनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. शिक्षकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना सभागृहात निवांत बसण्याची वेळ आली.

जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात दररोज शिक्षणाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दरवाजावर रांगा लागत असल्याचे चित्र आहे. किरकोळ कारणांसाठी अनेक जण या कार्यालयासमोर रांगा लावून शिक्षणाधिकाऱ्यांची विनाकारण वाद घालतानाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, आपल्या कैफियत ऐकून घेत नाहीत, अनेक फायली पेंडिंग आहेत, अशी तक्रार करणाऱ्यांना चपराक बसेल, अशी घटना गुरुवारी समोर आली आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी गुरुवारी शिक्षक संवाद दिनाचे आयोजन हरीभाई प्रशालेत करण्यात आले होते. सकाळी 11 ते सायंकाळी सहापर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप शिक्षक संवाद मेळाव्यासाठी सभागृहात बसून होते. सकाळच्या सत्रात केवळ 17 शिक्षकांनी उपस्थिती लावून आपल्या तक्रारी मांडल्या आणि दुपारच्या सत्रामध्ये अकरा शिक्षक तक्रारी मांडण्यासाठी आले. पेन्शन नाही, वेतन अद्याप केले जात नाही, शाळेत गैरप्रकार आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी या शिक्षकांनी केल्या. पण दररोज माध्यमिक शिक्षण कार्यालयासमोर उभे राहून गोंधळ करणारे अनेक शिक्षक दिसलेच नाहीत. अशा शिक्षकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी शिक्षण अधिकारी मोकळेपणाने सभागृहात बसलेले असतानाही या शिक्षकानी पाठ फिरवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारी ऐकून घेण्यासाठी शिक्षण अधिकारी जगताप यांना शिक्षकांची वाट पहावी लागली. दररोज कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी अनेकजण दरवाजा ढकलून, शिपायला दमदाटी करून आत घुसताना दिसून येतात. पण आज शिक्षणाधिकारी सभागृहात ओपन बसलेले असताना कोणीच फिरकले नाही, हे विशेष.

तक्रारी करणाऱ्यांमध्ये कापरे, पांढरे यांनी वरिष्ठ लिपिकाची सेवाजेष्ठता डावलली जात आहे, दोडमणी यांनी पेन्शन मिळत नसल्याची कैफीयत मांडली. दिगंबर निर्मळे यांनी 2019 मध्ये पगार काढला नाही, आता निवृत्त झालो तरी संस्थेने वेतन अनुदान दिले नसल्याची तक्रार केली. ह.दे. प्रशालेच्या तीन शिक्षकांनी जानेवारीपासून वेतन मिळत नसल्याची तक्रार केली.  बाबुराव सोनवणे यांनी शाळेत गैरप्रकार असल्याचे निवेदन दिले. अशा किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी करण्यासाठी शिक्षक आले पण जिल्हा परिषदेत दररोज गर्दी करणाऱ्या शिक्षकांची कोणती कामे असतात व ते का गोंधळ करतात याचा उलगडा शिक्षक संवाद दिनातून झालाच नाही. शिक्षक संवाद दिनात माध्यमिक शिक्षण विभागाच्या सर्वच प्रकारची निवेदने, तक्रारी ऐकून घेण्यात येणार होत्या व त्यावर जागेवर निर्णय घेण्यात येत असल्याचे शिक्षण अधिकारी जगताप यांनी सांगितले. शिक्षक संवाद दिन यशस्वी करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिक अरविंद ताटे, अनिल पाटील, रेवे,  कोरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button