सोलापूर: शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढ आणि शैक्षणिक विषयांचे विचारमंथन यासाठी बागलवस्ती-बारलोणी शाळेमध्ये बारलोणी केंद्रातील शिक्षकांची जुलै महिन्याची शिक्षक परिषद पार पडली. या परिषदेमध्ये शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आलेख मांडला गेला.
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिक्षण परिषदेची सुरूवात झाली. शिक्षण परिषदेच्या निमित्ताने बारलोणी केंद्रातील प्रत्येक शाळेस बागलवस्ती बारलोणी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक सहकार संघटनेने राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांच्याकडून लेखक अजित कणसे लिखित “शालेय परिपाठ” हे पुस्तक भेट देण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या “बुके नको बुक द्या” या आवाहनाला प्रतिसाद देऊन आजच्या शिक्षण परिषदेत एकही बुके, फूल यांचा वापर न करता सर्वांना पुस्तके भेट देण्यात आली. तसेच पुण्याच्या एटीएसई प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळविल्याबद्दल बागलवस्ती शाळेचा विद्यार्थी राघव निलेश देशमुख याचा व गुणवत्ता यादीत आलेल्या मयुरी प्रभाकर बागल, आरव शशिकांत गोरे, शौर्य सुरज बागल यांचा लेखक दिपक पारडे यांचे ‘ज्ञान आपल्या दारी’ हे पुस्तक भेट देऊन माजी उपसभापती सुरेश बागल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी उपसभापती सुरेश बागल यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून आता एनसीईआरटीचा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे इतर खासगी शाळेत मुलांना घालण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. तसेच बागलवस्ती शाळेचे मुख्याध्यापक निलेश देशमुख यांचा मुलगा राघव स्वतः अध्यापन करत असलेल्या शाळेत शिकत असल्याने हे आदर्श व अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख संजीवनी पौळ यांनी विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेतला तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या विविध विषयावर मार्गदर्शन केले. परख राष्ट्रीय सर्वेक्षण-२०२४- सोलापूर जिल्हा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन नवले वस्ती शाळेच्या शिक्षिका सरस्वती चौधरी यांनी केले. कृति कार्यक्रम – गटकार्य व सादरीकरण हा विषय भांबुरेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक गणेश गोसावी यांनी उदाहरणासह समजावून सांगितला. शिक्षण परिषदेचे सुत्रसंचालन धनाजी लोंखडे यांनी तर आभार प्रदर्शन बागलवस्ती-बारलोणी शाळेचे मुख्याध्यापक निलेश देशमुख यांनी केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी सहशिक्षका सुजाता वाघ, शिवाजी शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बागल, सदस्य शशिकांत गोरे, आदेश बागल, बापूसाहेब घोडके यांनी परिश्रम घेतले.

More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी