सोलापूर झेडपी कर्मचारी भरती घोटाळा: भाग 2
सोलापूर समाचार विशेष
राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत सन 2021 च्या कर्मचारी भरतीत ग्रामपंचायत कोट्यातून भरावयाच्या पदांमध्ये झालेला घोटाळा चर्चेत असतानाच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला सादर केलेल्या अहवालात ही कर्मचारी भरती नियमसंगत असल्याचा अहवाल दिल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अहवालात गडबड झाल्याचे नमूद असताना दिलीप स्वामी यांच्या अहवालामुळे या भरतीत कोणाचं खरं? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेने सन 2021 मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी कोट्यातून केलेल्या पदभरतीत 55 पदे ज्यादा भरली गेल्या बाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण युनियनने मुंबई उच्च न्यायालयातही नेले होते. न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावर आठ आठवड्यात निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 24 ऑगस्ट रोजी संघटनेला स्पष्टीकरण दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अहवालानुसार जून 2021 मध्ये झालेल्या कर्मचारी भरतीत अनियमितता झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. पण स्वामी यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यामुळे कर्मचारी युनियनला प्रशासनाविषयी संशय निर्माण झाला आहे.
जून 2021 च्या कर्मचारी भरतीबाबत शासनाकडून 23 मार्च 2023 रोजी पत्र आल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांना 12 एप्रिल 2023 रोजी अहवाल सादर केला आहे. या अहवालात स्वामी म्हणतात की, जिल्हा परिषद कर्मचारी भरतीबाबत एक डिसेंबर 2022 रोजी शासनाच्या अव्वर सचिवांनी सूचना देणारे पत्र जारी केले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी भरती करताना ग्रामपंचायत कोट्यातून दहा टक्के कर्मचारी भरतीबाबत कशी प्रक्रिया राबवली याबाबत खुलासा केला आहे. ही भरती करताना ग्रामविकास विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी 18 फेब्रुवारी 2021 रोजी पाठवलेल पत्रानुसार काटेकोरपणे करण्यात आली आहे. जून 2021 मध्ये जिल्हा परिषदेत कर्मचारी भरती झाली. ही भरती पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली आहे. पहिल्यांदा कॅम्प लावून कागदपत्राची पडताळणी करून त्यानंतर समुपदेशनाद्वारे नियमावलीसह प्रक्रिया पूर्ण केली आहे. लगतचे कॅलेंडर वर्ष म्हणजेच 2020 च्या रिक्त पदाप्रमाणे या भरतीतील पद संख्या निश्चित करण्यात आली होती.
पण मार्च 2019 च्या दरम्यान शासन स्तरावरून एकत्रित पदभरती बाबत जाहिरात निघाली होती. यामध्ये 415 पदांची भरती होणार होती. पण नंतर शासनाने ही जाहिरात रद्द केली. त्यानंतर कर्मचारी भरती बाबत शासनाचे सूचना देणारे पत्र निघाले आहे. पण हे पत्र निघण्यापूर्वीच सन 2021 ची भरती झाली आहे. यात सन 2019 अखेर एकूण रिक्त पदांचा विचार करता 1698 पदे रिक्त होती. यात ग्रामपंचायत विभागाच्या दहा टक्के कोट्याप्रमाणे एक्स 70 पदे रिक्त झाली असती. डिसेंबर 2020 च्या पदांचा विचार केल्यावर ही संख्या 141 इतकी झाली असती. त्यामुळे सन 2021 मध्ये जी पद भरती झाली ती 2019 च्या रिक्त पदाच्या तुलनेने कमी आहे. जून 2021 मधील ही पदभरती डिसेंबर 2022 ची रिक्त पदे विचारात घेऊन करण्यात आल्यामुळे ही कर्मचारी भरती नियम संगत असल्याचे तत्कालीन सीईओ स्वामी यांनी शासनाला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. आणि नेमके याच्यावरच युनियन बोट ठेवत पुढील दोन सीईओने दिलेला अहवाल खोटा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता कोणाचे खरे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

More Stories
‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळेत महिलांना मिळाले कॅन्सर प्रतिबंधासाठी ज्ञान
ट्रेनिंग सेंटरमध्ये बेकायदा बदली; त्या बदल्यात घर बांधून घेतले
सोलापूर मिनी मंत्रालयाची चावी महिलांच्या हाती; “सोलापूर समाचार’ चे वृत्त तंतोतंत खरे ठरणार