सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अस्थापनेचे स्वतंत्ररीत्या कामकाज मंगळवारपासून सुरू झाले असून पहिल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
देशात प्रथमच तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दिव्यांग कल्याण विभाग वेगळा करण्याचा निर्णय तत्कालीन युती सरकारने घेतला.त्यानंतर एक मे पासून राज्यातील तेरा जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे स्वतंत्र कामकाज सुरू करण्यात आले.राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांची नुकतीच नियुक्ती झाली आणि उर्वरित जिल्ह्यांत जिल्हास्तरावर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाची निर्मिती करुन शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पदभार सोपविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे निर्देशित केले आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेत तात्पुरती कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली असून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून सुलोचना सोनवणे यांच्याकडे पदभार सोपविला आहे.
जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब राजमाने यांच्याहस्ते युगपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन केले.यावेळी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मल्लिकार्जुन मळगे, संस्थाचालक शरद उकिरडे, सपना चिट्टे, चित्रसेन पाथरुट, शशीभूषण यलगुलवार,संजीव इटकर, भिमराव धोत्रे, माधव देवकर, समीर तडवळकर, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक मुठाळ,काॅंग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र कुलकर्णी, प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक भिमाशंकर लोखंडे उपस्थित होते. सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे कार्यालय सुरू केले असून दिव्यांग बांधवांना सहजपणे कार्यालयात येता येईल, अशा ठिकाणी कार्यालयाची व्यवस्था करण्यात येईल,असे नुतन प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सोनवणे यांनी सांगितले. राष्ट्रीय न्यास समितीचे सदस्य दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.

More Stories
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ राज्य अतिरिक्त सरचिटणीसपदी अरुण क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी गिरीश जाधव
गोष्ट जिल्हा परिषदेच्या शाळेतील 19 विद्यार्थ्यांच्या हृदयांची
होय, गायरानावर अडकली गरिबांची घरकुले!