March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

ऐकाव ते नवलच! गोळा केली पाच खोकी, साहेबाला दक्षिणा 50 हजाराचीच!

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत जून 2021 मध्ये झालेल्या कर्मचारी भरतीतील घोटाळ्याची चर्चा सध्या गाजत आहे. हे प्रकरण बाहेर आल्यावर कर्मचारी वेगवेगळ्या कथा एकमेकांना सांगत आहेत. याबाबत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागात जाऊन कानोसा घेतला असता कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात चाललेली ही चर्चा धक्कादायक निघाली. त्यावेळी म्हणे पाच “खोकी’ जमा केली गेली. या प्रकरणाची कुण कुण लागतात चौकशीचे पत्र आले. त्यासाठी साहेबाला केवळ “पन्नास’ हजाराची दक्षिणा देताच हे काम भागले, अशी चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.

“सोलापूर समाचार’ने जिल्हा परिषदेत कोरोना महामारीच्या काळात म्हणजेच जून 2021 मध्ये झालेल्या कर्मचारी भरतीतील घोटाळा बाहेर काढला आहे. त्यात ग्रामपंचायत कोट्यातून दहा टक्के कर्मचारी भरताना ज्यादा जागा भरल्या गेल्या. सन 2023 मध्ये पुढील कर्मचारी भरताना हा विषय ऐरणीवर आला. त्यामुळे सन 2019 पर्यंत च्य भरतीची फाईल तपासण्यात आली. यात जून 2021 मध्ये भरलेल्या जागांच्या तुलनेत 55 जागा अतिरिक्त होताना दिसून येत आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने हा प्रश्न लावून धरला आहे. नेमके त्यावेळी काय घडले याबाबत आता कर्मचारी वेगवेगळी चर्चा करताना दिसून येत आहेत. त्यामध्ये मोठी उलाढाल झाल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

या घोटाळ्याच्या अनुषंगाने कर्मचारी एकमेकांना वेगवेगळी माहिती सांगताना दिसून येत आहेत. या प्रकरणाचा “मास्टरमाईंड’ खूपच चलाख निघाला असे बोलले जात आहे. कोरोना महामारी आहे. पुढे याबाबत कोण विचारणार? असा अंदाज लावून या “मास्टरमाईंड’ ने आपली यंत्रणा कामाला लावली. यात पाच “खोकी’ गोळा करण्यात आली. या प्रकरणाचा संशय आल्याने वरून पत्र आले. साहेबाला ही भानगड कळली तर आपले पंचायत होईल म्हणून “मास्टरमाइंड’ने फाईल तयार केली. साहेबापुढे ही फाईल नेल्यावर “आपण नंतर चर्चा करू’ असे उत्तर आल्यावर मात्र त्या “मास्टरमाईंड’ ची पाचावर धारण बसली. काय करावे या विवंचनेत असतानाच त्याने पुन्हा शक्कल लढवली. पुन्हा फाईल पाठवताना वर 50 हजाराची दक्षिणा ठेवली. त्यामुळे “मास्टरमाइंड’ चे काम भागले, अशी धक्कादायक चर्चा कर्मचाऱ्यात ऐकावयास मिळाली.

तो पदाधिकारी कोण? 

प्रकरण इथेच थांबले नाही. तो “मास्टरमाइंड’ एका पदाधिकाऱ्याच्या कचाट्यात अडकला असे सांगण्यात येत आहे. “त्या’ चाणक्य पदाधिकाऱ्याने त्या “मास्टरमाईंड’ला चांगलेच घेरले. दोन आमदारांच्या पुढाकाराने हे प्रकरण विधानसभेत येईल असे त्याने तंबी दिल्याचेही सांगण्यात येत आहे. या तंबीनंतर या “मास्टरमाईंड’ ची पुन्हा पाचावर धारण बसली. धावपळ करून अखेर 25 पेट्यावर त्याने हे प्रकरण मिटविल्याची चर्चा आहे. यानंतर काळ गेला. पण कोंबड्याला कितीही झाकून ठेवले तरीही तो आरवायचे थांबत नाही. त्याप्रमाणे ही फाईल पुन्हा ओपन झाली आहे. जर यात फौजदारी झाली तर हे सर्व प्रकरण बाहेर येणार आहे. त्यामुळे हे प्रकरण धसास लावावे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे कर्मचारी “सोलापूर समाचार’ कडे व्यक्त करीत आहे. कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आम्ही जशीच्या तशी मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरे खोटे येणारा काळच  ठरवणार आहे. तोपर्यंत लगाव बत्ती… याबाबत आणखी काही माहिती व पुरावे असल्यास कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना “सोलापूर समाचार’ कडे विश्वासाने व्यक्त कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.