February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बालाजी अमाईन्सला रोटरी इंडियाकडून बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड 

दिल्ली : रोटरी इंडियाच्या वतीने देशभरातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (CSR) उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडिया नॅशनल CSR अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूर या कंपनीने राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योगसमूह (Large Enterprise) या गटात आरोग्य क्षेत्रासाठी (Healthcare) बेस्ट प्रोजेक्ट हा पुरस्कार पटकावला आहे.

रोटरी इंटरनॅशनलचे संचालक के. पी. नागेश यांच्याहस्ते बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार वितरण समारंभ माणेकशॉ सेंटर, दिल्ली येथे १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडला. या कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष शरत जैन, सचिव मंजू फडके, रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्डचे कमिटीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पालेकर उपस्थित होते.

बालाजी अमाईन्स लिमिटेड ही सोलापूरातील अलिफॅटिक अमाईन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, व्यावसायिक यशासोबतच कंपनीने सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रात विशेषत: आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

कोविड काळापासून कंपनी सातत्याने आरोग्यसेवेच्या बळकटीसाठी काम करत असून, सोलापूर शहरात तीन रुग्णालयांचे नूतनीकरण केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यल्प किंमतीत किंवा विनामूल्य सेवा या रुग्णालयांच्या माध्यमातून गरजुंना मिळत आहे. या रुग्णालयांमध्ये आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्या कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड आहेत.

या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, “कंपन्यांवर CSR ची जबाबदारी कायदेशीररीत्या लागू होण्यापूर्वीच, आमच्या व्यवस्थापनाने १९९० च्या दशकात ‘बालाजी फाउंडेशन’च्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली होती. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये आम्ही सतत कार्यरत आहोत. आमचे चेअरमन ए. प्रताप रेड्डी नेहमी सांगतात की ज्या समाजातून आपण कमावतो, त्यालाच काहीतरी परत द्यावे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. आज रोटरी इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान मिळाल्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो. हा पुरस्कार बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचा आणि दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा गौरव असून, कंपनीने आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण या क्षेत्रांमध्ये उभारलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.