February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरणात शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप

साेलापूर : बारा वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी नराधम शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

धनाजी साेपान इंगळे (वय 48, रा. पाटकूल, ता. माेहाेळ) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पिडीतेच्या  फिर्यादीवरुन माेहाेळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. 14 एप्रिल 2023 राेजी यातील पिडीता ही शाळेत गेल्यावर तिला शिकविणारे शिक्षक आराेपी धनाजी इंगळे हे अगाेदरच वर्गात हजर हाेते. त्यांनी पिडीतेला वर्गात थांबवून घेऊन इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबण्यास सांगून, वर्गामध्येच या बारा वर्षाच्या पिडीतेवर शारीरीक लैंगिक अत्याचार केले. ही घटना शाळेशेजारी शेतात काम करण्या-या शेतक-याने पाहिली व त्याला ही बाब संशयास्पद वाटल्याने त्याने 2-3 दिवस अगाेदरपासून शाळेवर व संबंधित शिक्षकांवर लक्ष ठेवले हाेते. त्यानंतर 15 एप्रिल 2023 राेजी त्याच्या भावाच्या मदतीने शेतक-याने त्या वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला. 15 एप्रिल 2023 ची सकाळची घटना त्या कॅमे-यामध्ये चित्रीत झाली. ही घटना त्या शेतक-याच्या भावाच्या माेबाईलमध्ये ध्वनीमुद्रित झाली हाेती. ते चित्रीकरण घेवून, त्या शाळेत जावून मुख्याध्यापकांसमक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बाेलावून त्यांचे समक्ष शेतक-याने काेणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष त्याने कबूल करावा, अशी विचारणा केली असता प्रथमतः काेणीही समाेर येण्यास तयार नव्हते. परंतु माझ्याकडे चित्रीकरण आहे, असे सांगितले असता आराेपी इंगळे हा स्वतःहून समाेर आला व माझ्याकडून चूक झाली मला माफ करा, अशी कबुली दिली.

त्यांनतर त्या पिडीतेला 14 एपिल्र 2023 राेजी ज्या शेतक-याने पाहिले हाेते, तिच्या वडीलांना या घटनेबाबत सांगितले. तेव्हा त्यांनी पिडीतेकडे चाैकशी केली असता, त्या बालिकेने घाबरुन 4-5 दिवसानंतर शिक्षकाच्या दुष्कृत्याबाबत माहिती दिली व असा प्रकार त्या नराधमाने 3-4 पिडीतांसाेबत 3-4 वेळा केल्याचे सांगितले. त्यानंतर पिडीतेच्या वडीलांनी माेहाेळ पालिस ठाणी्यात फिर्याद दाखल केली.

या गुन्ह्याचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक विनाेद घुगे, पाेलिस हवालदार राजू पवार यांनी केला. परंतू तपासादरम्यान आराेपीच्या दहशतीमुळे इतर पिडीता तसेच चित्रिकरणामध्ये दिसत असणारी पिडीता ही जबाबाचेवेळी आली नाही. परंतु तिने व तिच्या पालकांनी आम्हाला काहीही जबाब दयावयाचा नाही असे लिहून दिले. तपास पूर्ण झाल्यावर पाेलिसांनी साेलापूर येथील विशेष न्यायालयात दाेषाराेप-पत्र दाखल केले.

या खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी,पिडीता, शेतकरी, त्याचा भाऊ, ज्याने चित्रीकरण केले हाेते ताे, डाॅक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. इतर पिडीता जरी न्यायालयासमाेर अथवा जबाबासाठी आल्या नाहीत, तरीही एक पिडीता, तसेच चित्रीकरणामध्ये दिसणारी पिडीता, चित्रीकरणाबाबतचा आलेला तपासणी अहवाल यावरुन  आराेपीनेच हा गुन्हा केलेला आहे. तसेच सरकारी पक्षाने दिलेले सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायाधीश सुरवसे यांनी आराेपीस भा. दं. वि. कलम 354 अ व 354 ब प्रमाणे एक वर्ष सक्त मजूरी तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 प्रमाणे आराेपीस त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व 50 हजार रुपये दंड व हा दंड पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. याप्रकरणात सरकारच्यावतीने अ‍ॅड. शीतल डाेके यांनी तर आराेपीच्यावतीने अ‍ॅड. धनंजय माने यांनी काम पाहिले.