सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत आल्यामुळे व मित्रपक्षांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुढील पाच वर्षे झेडपीत विरोधी पक्ष नेता हे पद नसणार आहे. त्यामुळे यापूर्वी विरोधी पक्ष नेत्यासाठी असलेली केबिन आता सर्व सदस्यांसाठी खुली करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सदस्य निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, पक्षनेत्या रश्मी बागल आणि पालकमंत्र्याचे ओएसडी घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडूनच निरोप असल्यामुळे विषय समितीसाठी भाजपबरोबर सर्व समावेशक इतर सर्व सदस्यांचा समावेश करण्याची सूचना आली होती. त्यानुसार या बैठकीत विषय समितीचे 83 सदस्य फायनल करण्यात आले. विषय समितीचे सदस्य फायनल झालेली यादी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. आता त्यांच्याकडून ही यादी फायनल होऊन सभेच्या दिवशी म्हणजेच 15 एप्रिल रोजी विशेष सभेत लखोटा उघडण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर त्यांच्या सत्कारासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा देताना शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य आपल्याकडे आले होते. या सदस्यांनी सर्वसमान निधी देण्याची मागणी करत सोबत येण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार चांगला करा, अशी सूचना केली होती. त्यानुसार विषय समितीचे सदस्य निवडताना त्यांनी सर्वांना न्याय देण्याची भूमिका मांडली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्यांचाही समावेश केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे विषय समितीच्या कामकाजात अधिक पारदर्शकपणा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व समावेशक समिती सदस्य झाल्यामुळे व जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत असल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची निवड करणे शक्यच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यापूर्वीच्या विरोधी पक्षनेते पदासाठी असलेली केबिन आता सर्व सदस्यांसाठी खुली करण्यात आली आहे. या सर्व हालचालीवरून जिल्हा परिषदेत आता पाच वर्ष विरोधी पक्षनेता नसणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मागील काळात काका साठे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर प्रशासकाचा चार वर्षे कालावधी गेला. साठे हेच ही केबिन वापरत होते. सत्तांतर झाल्यानंतर या केबिनची रंगरंगोटी झाली. या केबिनवर सध्या झेडपी सदस्यांचा कक्ष असा बोर्ड लागला आहे. झेडपीत भाजपला बहुमत आहे. शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी भाजपबरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे. आता फक्त राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच मोहिते पाटील गटाची भूमिका कळलेली नाही. पण या गटालाही विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेप्रमाणे विषय समिती सदस्य पदासाठी सर्वसमावेशक यादी तयार केली आहे. पक्षनेत्या ही यादी पालकमंत्र्याकडे पाठवतील. त्यानंतर ही यादी फायनल होईल. विरोधी पक्षनेते पदाचे अजून काही ठरलेले नाही.
दीपक वैद्य,
अध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद


More Stories
समाजकल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ
उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त 9 एप्रिल रोजी सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम
झेडपी अध्यक्षांना एसयूव्ही 700 तर सभापतींना स्कॉर्पिओ