सोलापूरजिल्हा परिषद

एकीकडे शाळा प्रवेश स्वागताची जोरदार तयारी दुसरीकडे शिक्षकावर केला अन्याय

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवार दि. 15 जून रोजी उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सवाच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह 1000 अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजर राहणार आहेत. एकीकडे स्वागताची ही तयारी सुरू असताना दुसरीकडे अक्कलकोटच्या मुख्याध्यापकावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

सोमवार दि. 15 जूनपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 2 हजार 768 शाळांची घंटा वाजणार असून नव्याने प्रवेश घेणार्‍या तसेच नियमित विद्यार्थ्यांच्या स्वागताची जिल्हा परिषदेने जय्यत तयारी केली आहे. गावोगावी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे आणि त्यांचा शाळेकडे ओढा वाढावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभातफेरी, स्वागत रॅली, पुष्पवृष्टी, गुलाबपुष्प, चॉकलेट आणि विविध गोड पदार्थांचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. विशेषतः प्रथमच शाळेत येणार्‍या चिमुकल्यांसाठी आकर्षक सजावट, फुगे आणि आनंददायी वातावरण तयार करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षण समित्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील शिक्षक दोन दिवस अगोदरच शाळेत उपस्थित राहून वर्गखोल्या, परिसर स्वच्छता, पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि स्वागत कार्यक्रमाची आखणी करणार आहेत.यावर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे 22 लाख पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून त्यापैकी 18 लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत. तसेच 1 लाख 80 हजार 527 विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची तयारी पूर्णत्वास येत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जोरदार तयारी केली असली तरी एका शिक्षकाची कैफियत ऐकून वाईट वाटले. मैंदर्गी शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या महांतेश कट्टीमनी यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई करताना त्यांना नोटीस बजावली नाही. निलंबनावेळी त्यांना दक्षिण पंचायत समिती मुख्यालय दिले. कालावधी संपल्यानंतर सीईओने त्यांना पुनरस्थापित केले. यावेळी मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी शाळा बदलून मागितली पण ती अमान्य करण्यात आली. त्यावर गटशिक्षण अधिकारी जयश्री सुतार यांनी त्यांना पुनरस्थापित केलेल्या नैसर्गिक शाळेवर हजर राहण्याबाबत पत्र दिले. वास्तविक गटशिक्षणाधिकारी सुतार यांनी त्यांना दक्षिण पंचायतमधून कार्यमुक्त करत असल्याबाबत अक्कलकोट पंचायत समितीला पत्र देणे गरजेचे होते. पण गटशिक्षणाधिकारी सुतार यांनी चूक केली. थेट शाळेवर हजर राहण्याबाबत त्यांना पत्र काढण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी तसे पत्र काढले. जरी त्यांनी असे पत्र काढले तरी या पत्रासोबत शाळेवर हजर राहण्याचा आदेश देणे गरजेचे होते. त्यामुळे मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी सीईओना पत्र दिले. त्यावर पुन्हा अक्कलकोट पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी 11 जून रोजी त्यांना शाळेवर हजर राहण्याबाबत पत्र दिले. पण सोबत आदेश दिला नाही. निलंबन कालावधीनंतर त्यांना वेतन व भत्ता सुरू केला नाही. त्याबाबत त्यांनी पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळेस दखल घेतली असती तर मुख्याध्यापक कट्टीमनी यांनाही शाळा प्रवेशोत्सवात भाग घेतला असता. मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्या तक्रारीबाबत विचारल्यावर शिक्षणाधिकारी शेख यांनी व्हाट्सअपवर आदेश दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यातील तथ्य कागदपत्राच्या तपासणीनंतर पुढे येणार आहे.

मुख्याध्यापक कट्टीमनी यांना पुनरस्थापनेनंतर व्हाट्सअपवर आदेश दिलेला आहे. आदेश मिळाला नसेल तर त्यांनी आपल्याकडे अपील करणे आवश्यक होते. अशा प्रकारच्या सर्वच शिक्षकांना शाळेवर हजर राहण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.

कादर शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button