सोलापूरक्राईमसोलापूर ग्रामीण पोलीस

तांदूळवाडीजवळ छोटा हत्ती वाहन विहिरीत कोसळून आठ भाविकांचा बुडून मृत्यू

पंढरपूर: म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली. छोटा हत्ती हे वाहन विहिरीत कोसळून त्यातून प्रवास करणाऱ्या आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविकांना घेऊन जाणारा छोटा हत्ती हे वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. इंदुबाई दशरथ बावचे, पूजा अमोल सातोरे, अरब अमोल सातोरे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, संस्कार संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, समर्थ बालाजी बावचे (सर्व राहणार पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.  रांजणी गावातील काही भाविक म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण छोटा हत्ती या वाहनातून परतत असताना दुपारच्या सुमारास तांदूळवाडी परिसरात हा भीषण अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन रस्त्याच्याकडेला असलेल्या खोल विहिरीत जाऊन पडले.विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य यंत्रणा सक्रिय केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त करीत मृतांच्या नातेविकास पाच लाख तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button