June 23, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपीच्या छ. शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 2 कोटीचा आराखडा

सोलापूर : रंगभवन चौकात असलेल्या झेडपीच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रंगभवन चौकात जिल्हा परिषदेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. जिल्हा परिषदेच्या निर्मिती वेळेस म्हणजेच 1960 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती उभा पुतळा आहे. सोलापुरात पहिल्यांदाच उभा करण्यात आलेला हा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा असल्याने या बागेचे सुशोभीकरण करण्याचा मनोदय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवराज्याभिषेक दिनी आयोजित कार्यक्रमात केला होता. त्यानुसार या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार सुमारे दोन कोटी खर्च करून या उद्यानाचे रुपडे पालटण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोहोबाजूनी झाडे वेढल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथर्‍याची उंची वाढवून हा चौथरा आकर्षित करण्यात येणार आहे. बागेतील झाडे आहेत तशीच ठेवून उद्यानाचे रूप आणखी वाढेल अशी रचना करण्यात येणार आहे. तयार करण्यात आलेला आराखडा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दाखवून त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती शिवकालीन वस्तूंचा संग्रह नागरिकांच्या माहितीसाठी जमा करण्याचा प्रस्ताव असल्याचेही उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले.

25 जून रोजी पंढरपूरला सभा 

जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा 25 जून रोजी सकाळी 11 वाजता गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिली. दौऱ्यापूर्वी पालखी मार्गाचा पदाधिकारी पाहणी दौरा करतील. त्यानंतर आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या खर्चाबाबतचे विषय आणि पालखी मार्गावरील असणाऱ्या 81 गावातील सुविधांबाबत संबंधित सदस्यांकडून येणाऱ्या सूचना व समस्यांचा विचार केला जाणार आहे.

एक पाऊल असणार पुढे…

आषाढी वारीच्या नियोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी माहिती दिली. वारीकाळात राज्यभरातून 35 लाख भाविक येतील या पद्धतीने नियोजन केले आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वच्छगृह स्नानगृह यांची व्यवस्था दुपटीने केली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा याबाबत मोठे नियोजन आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी वारीचे चांगले नियोजन झाले. या नियोजनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांनी पुणे, सातारा व सोलापूर येथील यात्रेच्या सुविधांचे टेंडर काढण्याचे अधिकार सोलापूर जिल्हा परिषदेला दिले. या तिन्ही जिल्ह्याच्या नियोजनावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. गतवर्षीच्या धर्तीवर एक पाऊल पुढे ठेवत यावर्षीचेही नियोजन असणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दिली.