सोलापूर: रजेच्या कारणावरून धमकी देत एका सहशिक्षकाने चक्क मुख्याध्यापकाला बेदाम मारहाण केल्याची घटना दक्षिण सोलापुरातील कुंभारी झेडपी शाळेत गुरुवारी घडली आहे.
या घटनेमध्ये मुख्याध्यापकाचे कान फाटले असून ते जखमी झाले आहेत. कुंभारी जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील हे कामकाज करीत असताना क्षीरसागर नावाच्या सहशिक्षकाने रजेच्या कारणावरून मारहाण केली असे जखमी मुख्याध्यापकांनी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारास दाखल झाल्यावर पोलिसांना सांगितले. शिक्षकाच्या महाराणीत मुख्याध्यापक जखमी झाल्याचे पाहून गावातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींनी रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केले. क्षीरसागर यांनी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना रजा मागितली,परंतु आज शाळेत कार्यक्रम आहे, रजा देता येणार नाही, असे सांगत मुख्याध्यापक पाटील यांनी त्यांना रजा नाकारली. त्यामुळे संतापलेल्या क्षीरसागर यांने मुख्याध्यापक पाटील यांना लाकडी दांडा व लाथाबुक्याने मारहाण केली. केंद्रप्रमुख कुंदा राजगुरू, कुंभारीचे सामाजिक कार्यकर्ते गजानन होनराव, स्वप्निल थिटे, ग्रामपंचायत सदस्य वंजारी, आप्पाशा चांगले यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि जखमी मुख्याध्यापक पाटील यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
केंद्र प्रमुखांना दमदाटी
घटना घडत असताना केंद्र प्रमुख कुंदा राजगुरू यांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनाही “त्या’ शिक्षकाने दमदाटी व शिवीगाळ केली. यामुळे महिला केंद्रप्रमुखांना रडू कोसळले. झेडपी शाळेत असा प्रकार घडल्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. आता झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे व शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले हे त्या शिक्षकावर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.