March 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पालकमंत्री पदासाठी सोलापूरला पुन्हा ठेंगा

  1. राजकुमार सारोळे
  2. सोलापूर : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जाहीर केली. या सुधारित यादीतही सोलापूरला ठेंगा दाखवत चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे: पुणे- अजित पवार, अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूर- चंद्रकांत पाटील, अमरावती- चंद्रकांत पाटील, भंडारा- विजयकुमार गावित, बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील,
कोल्हापूर- हसन मुश्रीफ, गोंदिया- धर्मराव आत्राम,बीड- धनंजय मुंडे,परभणी- संजय बनसोडे, नंदूरबार- अनिल पाटील, वर्धा- सुधीर मुनगंटीवार.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर सोलापूर पालकमंत्र्याचे जबाबदारी विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली. भविष्यात पालकमंत्री बदलतील या अंदाजाने विखे- पाटील यांनी सोलापूरकडे दुर्लक्ष केले, असेच म्हणावे लागेल. त्यांच्या कारकिर्दीत सोलापूरसाठी असे ठोस कोणतेच काम झाले नाही. याशिवाय ते सोलापुरात आल्यानंतर आयोजित बैठकांना दोन्ही देशमुख आमदारांचे समर्थक गैरहजर राहताना दिसून येत होते. सोलापूर महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार विजयकुमार देशमुख यांना पालकमंत्री पद मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण नव्या विस्तारात ही अपेक्षा फोल ठरल्याने देशमुख समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. भाजपमध्ये पक्षादेशाला महत्त्व आहे. त्यामुळे श्रेष्ठीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल कोणीच काही बोलत नसले तरी नव्या निवडीचा जल्लोष कोठेच दिसून आला नाही. तसेच अजित पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती पवार यांचे समर्थक आमदार संजय मामा शिंदे यांचे नाव चर्चेत होते. पण जिल्ह्यातील भाजप आमदारांची संख्या पाहता भाजपच्याच कोणत्यातरी आमदाराला संधी मिळणार अशी चर्चा होती. पण ही चर्चा फोल ठरल्यामुळे पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या पदरी निराशाच आली आहे. सोलापुरातील भाजपमधील वातावरण कसेही असो आता नव्या पालकमंत्र्यांनाही शहरातील दोन्ही देशमुख यांना जमवून घ्यावेच लागणार आहे असे बोलले जात आहे.