सोलापूर : जून महिना म्हटला की शिक्षणाचा विषय चर्चेचा. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. सर्व शाळांचे प्रवेशोत्सव पार पडल्यानंतर खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर प्रवेश फी, गणवेश, स्कूलबस, मेस अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. सरकारी शाळांमध्ये चांगली सोय असतानाही अनेक पालका परिस्थिती नसतानाही खाजगी शाळांमध्ये आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून धडपडताना दिसून येतात. मग या खाजगी शाळांच्या नियमावली पुढे काही पालकांचा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष कधीकधी इतका टोकाला जातो की पालक कागदी घोडे नाचविण्यास सुरुवात करतात असाच एक किस्सा सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयात शुक्रवारी घडला. शाळेतून मुलाला घेऊन हा पालक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याच्या दालनात आला व त्यांने थेट शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न केला, ‘साहेब.. तुम्हाला तुकडी बदलण्याचा कायदा माहित आहे काय? आता यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी काय उत्तर द्यावं?
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे शुक्रवारी आपल्या कार्यालयात कामात व्यस्त होते. कामानिमित्त आलेल्यांची कार्यालयाबाहेर रांग लागली होती. एक एक करून त्यांनी सर्व भेटकर्त्यांचे प्रश्न ऐकून त्यावर निर्णय दिले. एक युवती आपल्या वृद्ध आईला घेऊन शाळेतील मानधनाबाबत कैफियत मांडण्यासाठी आली होती. शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ तिचा अर्ज स्वीकृत करून काम होईल, असे सांगितले. त्यावर त्या वृद्ध महिलेने मी पुन्हा केव्हा येऊ? असा सवाल केला. त्यावर शिक्षणाधिकारी जगताप यांनी आता तुम्ही येऊच नका, शाळेतच तुमचे काम होऊन जाईल, असे उत्तर दिले. त्यामुळे समाधानाने ती वृद्ध महिला निघून गेली. अशात एक पालक रांगेतून वाट काढत आपल्या पाल्याला घेऊन पत्नीसह शिक्षणाधिकाऱ्यासमोर येऊन बसला. मला एका शाळेला व्हिजिटला जायचे आहे, आणखी कोणाचे अर्जंट काम राहिले आहे काय? अशी शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारणा केली. कोणाचेच उत्तर न आल्याने ते उठून जात असतानाच त्या पालकाने शिक्षणाधिकाऱ्यांना थांबवले, माझे अर्जंट तुमच्याकडे काम आहे असे त्यांने सांगितले. शिक्षणाधिकाऱ्यांनी बोला, असे म्हटल्यावर ‘तुकडी बदलाचा कायदा तुम्हाला माहित आहे काय?” असा त्याने सवाल केला. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनीही ‘नाही बाबा, मी इतका शिकलेला नाही” असे मिस्कीलपणे उत्तर दिल्यानंतर त्या पालकाने तावतावाने आपला प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. जैन गुरुकुलमध्ये माझा मुलगा आठवीत शिकत आहे. शाळेने मला किंवा पालक शिक्षक समितीला न विचारता त्याची तुकडी बदलली आहे. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान होणार आहे असे असे त्याने सांगताच शिक्षणाधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला. तुकडी बदलली म्हणजे काय झाले? असे त्यांनी विचारल्यावर त्या पालकाने माझ्या मुलाला क मधून ब तुकडीमध्ये घातल्याचे सांगितले. उलट चांगले झाले ना, लोक वरच्या तुकडीत प्रवेश मागतात. तुमची काय अडचण आहे असे विचारल्यावर ब तुकडी मध्ये विषय कमी आहेत असे त्याने उत्तर दिले. अरे बाबा, माझ्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असलेले तक्रारदार उभे आहेत, तू मुख्याध्यापक काळे यांना भेट, मी त्यांना सांगतो. तुकडीबद्दलच्या कायद्याबद्दल काय विचारतो? असे म्हटल्यावर सर्वांना हसू फुटले.

More Stories
सोलापुरात सायबर पोलिसांचा छापा: आयटी कंपन्यांना फसविणारे मोठे रॅकेट उघड
विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर
डॉ. सतीश कोपूरवाड यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा