सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपी सीईओच्या पीएची थेट विभागीय आयुक्तांकडून नियुक्ती

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अक्कलकोटला बदली झालेल्या पूर्वीच्याच पीएची थेट विभागीय आयुक्तांकडून प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे याबाबत प्रशासन विभागाकडून कोणताच प्रस्ताव केलेला नसताना सोलापूर झेडपीच्या इतिहासात प्रथमच हा चमत्कार घडला आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पीए म्हणून तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या काळापासून सुधाकर देशमुख हे कार्यरत होते. कर्मचाऱ्यांच्या झालेल्या नुकत्याच बदल्या प्रक्रियेत देशमुख यांची अक्कलकोट ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला बदली झाली. त्यामुळे त्यांनी बदलीच्या ठिकाणी पदभार घेतला. या काळात देशमुख यांना विरोध झाल्याने त्यांना पीएच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले होते. त्यांच्या कक्षातील नेमफलकही हटविण्यात आला होता. त्यामुळे सीईओ कुलदीप जंगम हे नवीन पीए कोणता निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अशात सुधाकर माने देशमुख हे शनिवारी पुन्हा आपल्या कक्षात हजर झाले आहेत. विभागीय आयुक्तांकडून प्रतिनियुक्ती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्तांकडून त्यांनी प्रतिनियुक्ती कशी आणली? याबाबत आता जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. देशमुख यांच्या प्रतिनियुक्तीबाबत जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडून कोणताही प्रस्ताव गेला नव्हता, असे सांगण्यात येत आहे. सीईओ जंगम यांनी थेट प्रस्ताव पाठवून ही नियुक्ती आणली अशी आता चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या वेळेस प्रशासन व अधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा होती. यातून बांधकाम व अर्थ विभागाच्या बदल्या झाल्याच नाहीत. अशात सीईओच्या पीएची थेट विभागीय आयुक्तांनी प्रतिनियुक्ती केल्यामुळे या चर्चेला बळ मिळाल्याचे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे. जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी पंचायत स्तरावर बदल्या झालेल्या असताना ठाण मांडून आहेत. विभागीय आयुक्त त्यांच्याही प्रतिनियुक्त्या कायम करणार का? माध्यमिक व समाज कल्याण विभागाकडे कर्मचारी कमी आहेत. याबाबत सीईओंकडे अनेक कर्मचाऱ्यांच्या फायली प्रलंबित आहेत? त्यांनाही आता प्रतिनियुक्ती मिळणार का याबाबत कर्मचाऱ्यांमधून चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button