सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. होस्टन व जर्सी या दुभत्या जनावराच्या किमती निम्म्याने खाली आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
कोरोना महामारीनंतर शहरांमध्ये कंपन्यांमध्ये नोकरी करणारे अनेक तरुण नोकरी गेल्यावर आपल्या गावी पशुपालनामध्ये रमले होते. त्यामुळे जिल्ह्यातील दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनावर भर दिला आहे. शेतीला सेंद्रिय खत व शेती कामासाठी दुग्ध उत्पादनातून पैसा उपलब्ध होऊ लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात बिऱ्हाड मांडून शेती उत्पादनात नवीन प्रयोग सुरू केल्याचे दिसून येत आहे. एकीकडे दूध उत्पादनात वाढ व दुसरीकडे शेती उत्पादनात वाढ झालेले असतानाही शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणे आवश्यक होते. पण शेतकऱ्यासमोरील संकटाची मालिका काही कमी होत नाही असे दिसून येत आहे. दुग्ध व्यवसाय तेजीत असतानाच उत्पादन वाढल्याने दुधाचे भाव पडले आहेत. अशात गेल्या दोन महिन्यात साऱ्यांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. दुखत्या जनावरांना लागणारे सकस खाद्य म्हणजे सुग्रास, पेंड, भुसा यांच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे दुधाचे दर पडलेले आहेत. खर्च आणि उत्पादनात मेळ घालताना शेतकऱ्यांना पशुपालन अवघड झाले आहे. त्यामुळे बरेच शेतकरी चांगल्या दुखत्या काही विक्रीस काढताना दिसून येत आहेत. यामुळे बाजारात दुभत्या गाईंच्या किमती निम्म्याने खाली आल्या आहेत. वीस लिटर दूध देणाऱ्या होस्टन व जर्सी गाई यापूर्वी लाखाच्यावर मिळत होत्या. पण आता याच गाई 50 ते 60 हजारापर्यंत विकल्या जाऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात हिरव्या व कोरड्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. खरिपात मोठ्या प्रमाणावर तूर तर रब्बी हंगामात यंदा मोठ्या प्रमाणावर हरभरा व गव्हाची लागवड करण्यात आली आहे. ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे कडब्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे चारा आणखीन महाग होणार आहे. भविष्यातील संकट ओळखून अनेक शेतकऱ्यांनी आहे त्या पडेल किमतीत गाई विकणे पसंत केले आहे. शासनाने दुधाचा भाव वाढवावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
थंडी वाढल्याने समस्या…
सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. गहू व हरभरा वाढीला हे वातावरण पोषक असले तरी अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे दुभत्या जनावरांना फटका बसत आहे. जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. यंदा जास्त काळ पावसाळा राहिल्यामुळे गोचीड यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे अनेक जनावरे दगावताना दिसून येत आहेत. चाऱ्यांबरोबरच आजारावरील उपायांचा खर्च शेतकऱ्यांना परवडनेसा झाला आहे. चाऱ्यांच्या किमती व आजारांचा त्रास यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसून येत आहे.