झेडपीच्या पदवीधर शिक्षकानी पदोन्नती घ्यावी की नाही?
काय सांगतो? शासनाचा अध्यादेश

सोलापूर : सध्या पदवीधर शिक्षक ग्रेड पे 4300/- घेणारे/ (एस -14 तील) असो किंवा ग्रेड पे 4400/- घेणारे(एस -15 तील) असो त्यांना मुख्याध्यापक किंवा केंद्र प्रमुखपदी पदोन्नती मिळाल्यानंतर एक वेतनवाढ देता येते किंवा येत नाही याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था होती. पदोन्नती स्वीकारावी की नाही? याविषयी अनेकांची द्विधा मनस्थिती झाली आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षक संघाने बैठक घेऊन मोठा खुलासा केला आहे.
शिक्षक संघाचे महासचिव म. ज. मोरे, जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे, उपाध्यक्ष ईरण्णा मैंदर्गी यांनी ग्राम विकास विभागाकडील दि. 26 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा किंवा जबाबदारीपेक्षा जास्त कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या नव्याने येत असल्यातील तर त्यांना एक वेतनवढ देता येते, हा संदर्भ घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेचे उप मुख्यलेखा व वित्त अधिकारी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यावर पाटील यांनी ऑलरेडी 4300/- ग्रेड पे घेणाऱ्या मुख्याध्यापकांपेक्षा पदवीधर शिक्षक, जास्त वेतन – ग्रेड पे 4400/- किंवा एस -15 या टप्प्यातील वेतन घेत असतील तर त्यांच्यासाठीच हा 26 सप्टेंबर 2023 चा शासन निर्णय झाला असून या निर्णयानंतर पदोन्नती मिळालेले मुख्याध्यापक किंवा केंद्र प्रमुख यांनी सध्या (पदोन्नती स्वीकारण्यापूर्वीच्या पदावरील ) S-14 या टप्यात वेतन घेत असतील तर त्या टप्प्यात (मुख्याध्यापक वेतन श्रेणीचा टप्पा S-14 च आहे म्हणून) किंवा मुख्याध्यापकांपेक्षा जास्त म्हणजे S- 15 मध्येही वेतन घेत असतील तरी सुद्धा त्या टप्प्यात एक वेतनवाढ देता येते. असे स्पष्टपणे सांगितले.
उपमुख्यलेखा व वित्त अधिकारी पाटील यांनी हा मोठा खुलासा केल्यामुळे पदोन्नतीस पात्र असणाऱ्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांनी मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख पदाची पदोन्नती स्वीकारण्यास हरकत नाही, असे आवाहन सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गाच्या पदोन्नत्या झाल्या आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्वांना थेट समुपदेशनाद्वारे पदोन्नती करून न्याय दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण विभागाच्या पदोन्नतीवर संघटनाने आक्षेप घेतल्यामुळे पदोन्नती लांबणीवर गेली होती. पदवीधर शिक्षकांच्या मनात पदोन्नतीबाबत अनेक शंका होत्या. त्यामुळे परीक्षानंतर पदोन्नती घेण्यात येईल असे सीईओ जंगम यांनी स्पष्ट केले होते. लवकरच आता परिक्षा होणार आहेत. परीक्षेनंतर पदोन्नती होणार असल्याने शिक्षकाच्या मनातीलही हा संभ्रम दूर करण्यात आला आहे. त्यामुळे झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.