March 20, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात पुढील वर्षापासून बोर्डाचे पेपर ठेवणार पोलीस कोठडीत

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पुढील वर्षापासून पुणे बोर्डाच्या दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. सांगोला येथील पेपर चोरी प्रकरणानंतर आता जिल्हा शिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा बुधवारी दि. 18 मार्च रोजी शेवटचा भूगोल विषयाचा पेपर असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास सांगोला येथील विद्या मंदिर प्रशालेच्या बोर्ड कस्टडीतून ५० प्रश्नपत्रिकांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता.

याबाबत सांगोल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले (वय ३४) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली होती. १६ मार्चला दुपारी साडेचार ते १७ मार्च रोजी सकाळी साडेआठ यावेळेत ही घटना घडली होती. सांगोला विद्यामंदिर येथील बोर्ड कस्टडी रूममध्ये ठेवलेल्या पेटी क्रमांक ५४४९ मधील भूगोल विषयाच्या २५-२५ प्रश्नपत्रिकांची पाकिटे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी १७ मार्च रोजी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास करून पेपर चोरी करणाऱ्याला साहित्यासह पकडले. अभ्यास न केल्याने दहावीतीलच एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचे उघड झाले. पेपर चोरीच्या प्रकरणानंतर पुणे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे .

आता मराठवाडा पॅटर्न…

सोलापूर जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षेच्यावेळी पुणे बोर्डकडून आलेले पेपर तालुक्याच्या कस्टडीत ठेवले जात होते. मराठवाड्यात मात्र यापेक्षा जास्त काळजी घेतली जात आहे. मराठवाड्यात संबंधित परीक्षा केंद्राच्या पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कोठडीमध्ये हे पेपर ठेवले जातात. पेपरच्या दिवशी दोन तास आधी संबंधित केंद्रप्रमुख पोलीस ठाण्यात जाऊन पत्र दिल्यानंतर डायरीत नोंद करूनच प्रश्नपत्रिका ताब्यात दिल्या जातात. सोलापूर जिल्ह्यातील पद्धत धोकादायक ठरल्याने आता मराठवाडा पॅटर्न अवलंबण्यात येणार आहे.

सांगोल्यातील प्रकरणाबाबत माध्यमिक शिक्षण विभाग पुणे बोर्डाला अहवाल सादर करणार आहे. आता पुढील वर्षापासून प्रश्न पत्रिकांबाबत ज्यादा खबरदारी घेण्यात येणार आहे. मराठवाड्याप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातही बोर्डाकडून आलेल्या प्रश्नपत्रिका पोलीस ठाण्याच्या कस्टडीत ठेवण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे.

सचिन जगताप 

माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर