March 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी

सोलापूर : सोलापुरात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली.

सोलापुरातील रंगभवन अहले हदिस ईदगाह येथे आज सकाळी 7.30 वाजता मोठ्या उत्साहात ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यात आली. रमजान महिनाभर उपवास, इबादत आणि संयम पाळल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मोठ्या श्रद्धा आणि आनंदाने ईद साजरी केली.यावेळी मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी इमामत केली. नमाजनंतर दिलेल्या संदेशात त्यांनी कुरआननुसार जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात शांतता, सौहार्द आणि बंधुभाव टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकमेकांविषयी आदर आणि प्रेम कायम ठेवणे गरजेचे आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.ईदच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव ईदगाहवर एकत्र आले होते. नमाजनंतर एकमेकांना मिठी मारून ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला. लहान मुलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला, तर वयोवृद्धांनीही समाधान आणि आनंद व्यक्त केला.

शहरात विविध भागांतही ईदच्या नमाजांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली.दरम्यान, ईदच्या निमित्ताने गरजू आणि गरीब बांधवांना मदत करण्याचाही संदेश देण्यात आला. जकात आणि सदका यांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचे आवाहन करण्यात आले. एकूणच, सोलापुरात ईद-उल-फित्र सण धार्मिक उत्साह, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाच्या वातावरणात शांततेत पार पडला.

सोलापूर शहरातील ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त आज पहाटेपासूनच श्रद्धा, शांतता आणि एकतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. शेकडो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि “सर्वांसाठी सुख-शांती” अशी प्रार्थना अल्लाहकडे मागितली.
रमजान महिन्याभराच्या संयम, त्याग आणि आध्यात्मिक साधनेनंतर आलेल्या ईदने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण केले. महिनाभर रोजे पाळत, कुरआन पठण करत आणि स्वतःला शिस्तीत ठेवत मुस्लीम बांधवांनी आत्मशुद्धी साधली. त्याचबरोबर ईदपूर्वी जकात आणि फित्रा देत समाजातील गरजू, वंचित घटकांनाही सणाचा आनंद मिळावा याची काळजी घेतली.
ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर मोठी गर्दी उसळली होती. सर्वांनी एकत्र नमाज अदा करत “एकता, समता आणि बंधुभाव” यांचा संदेश दिला. नमाजनंतर एकमेकांना मिठी मारत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देण्यात आल्या, ज्यातून सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसले.
होटगी रोड परिसरात आलमगीर ईदगाह येथे शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी सामूहिक नमाज अदा केली.

एकंदरीत रमजान ईदनिमित्त सोलापूर शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवीन कपडे परिधान करून मुस्लीम बांधव ईदगाहकडे मोठ्या आनंदात रवाना होत होते.
ईदची नमाज संपल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बंधुभाव आणि आपुलकीचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. अनेकांनी एकमेकांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत पारंपरिक सुरकुर्मा आणि गुलगुले यांचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह केला.
ईदच्या निमित्ताने सोलापूर शहरात प्रेम, आपुलकी आणि एकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
सर्वात शेवटी ईद ची नमाज आसार मैदान ईदगाह येथे सकाळी 10:30 वाजता पार पडली.
अहले हादिस ईदगाह रंगभवन येथेही हजारो मुस्लिम बांधव सकाळी 7:30 वाजता नमाज साठी एकत्र जमले. यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी नमाज पठण केली.

पानगल मैदान येथील शाही आलमगीर ईदगाह येथे सकाळी 9 वाजता नमाज पठण करण्यात आली.येथे मौलाना सय्यद अहमद गौरी हैद्राबादी यांनी नमाज नंतर सामूहिक प्रार्थना केली. यानंतर येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेत ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

जुनी मिल कंपाऊंड येथील ईदगाह येथे सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ईद चा आंनद जाणवत होता. लहान मोठे सर्वजण नवीन कपडे परिधान करून सुंगधित इत्र लावून डोळ्यात सुरमा लावत ईद च्या नमाज साठी दाखल झाले.यावेळी मोहम्मद सय्यद फजुलूल्लाह खतीब यांनी नमाज अदा केली.