सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संचमान्यतेचे निकष डावललेले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात शूक्रवारी संवर्ग एकमधील एकूण ६५४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये काही शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याचे समोर आले आहे. यामुळे कार्यरत शिक्षकच अतिरिक्त ठरण्याची वेळ आली असून याबाबतीत शिक्षकांसह संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे
वर्ष २०२४-२५ च्या संचमान्यता आधारावर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या बदल्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा विचार न करताच बदली प्रक्रिया राबवण्यात आली; तसेच
बदल्यांपूर्वी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे अत्यावश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.काही शाळांमध्ये आधीच मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत असताना त्या ठिकाणी नव्याने शिक्षक पाठवण्यात आले. त्यामुळे अशा शाळांमध्ये शिक्षक संख्येत वाढ झाली आहे . उदाहरणार्थ एका शाळेत मंजूर पदे ९ असून, आधीच १२ शिक्षक कार्यरत आहेत. तरीदेखील त्या शाळेला नवीन शिक्षक देण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बदल्यांचे काम खासगी सॉफ्टवेअर कंपनी ‘विन्सीस’ यांच्याकडे देण्यात आले आहे . या कंपनीने ज्या शाळांमध्ये मंजूर संचमान्यतेपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत त्या शाळांमध्ये नव्याने शिक्षक पाठवले जाणार नाहीत, असे स्पष्ट सांगितले होते. पण, प्रत्यक्षात त्या ठिकाणीदेखील शिक्षक पाठवण्यात आल्याने या बदली प्रक्रियेविषयी शिक्षक व शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांचे नियोजन चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे अनेक शिक्षकांना समायोजनाच्या फेऱ्यात अडकावे लागणार आहे. सध्या फक्त संवर्ग एकमधील बदल्या पार पडल्या. अजून संवर्ग २, ३ आणि ४ मधील बदल्या बाकी आहेत. जर अशीच प्रक्रिया पुढे सुरू राहिली, तर शिक्षक बदल्याची यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. विनाकारण शिक्षकांवर अतिरिक्त होण्यासारखा अन्याय शिक्षक सहकार संघटना सहन करणार नाही.
निलेश देशमुख,
राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की