March 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

ऐतिहासिक: मंद्रूपची जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा झाली 164 वर्षाची

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ही एक गौरवास्पदबातमी आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्नाटक सीमावृत्ती भागात असलेल्या मंद्रूप येथील जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळेला आज 164 वर्ष पूर्ण झाली आहेत. इंग्रजानी 18 व्या शतकात मंद्रूप पंचक्रोशीतील लोकांना शिक्षण मिळावे म्हणून ही केंद शाळा सुरू केली. आज ही शाळा वट वृक्षाप्रमाणे नावारूपाला आली आहे.

18 व्या शतकाल इंग्रजांचे राज्य असताना देशातील ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण अल्प होते. ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण मिळावे म्हणून इंग्रजांनी सरकारी शाळा सुरू केल्या. त्यात केंद्र शाळेचा समावेश आहे.

मंद्रूप– सोलापूर रस्त्यांकडेला इंग्रजांनी दगडी इमारत बांधून 18 जानेवारी1861 रोजी पहिली ते सातवी शाळा सुरू केली. त्याकाळी सातवी पास होणे म्हणजे मॅट्रिक पास होणे होते. असे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना सरकारी नोकऱ्या मिळत. मोडी भाषेत हे शिक्षण होते. 70 वर्षापूर्वी मराठीतून शिक्षण सुरू झाले. या शाळेत अनेक नामवंतांनी शिक्षण घेतले. 2 जून 1925 मध्ये गावातील खंडोबा मंदिराजवळ उर्दू शाळा सुरू करण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर 5 जून 1951 मध्ये सध्या असलेल्या ग्रामसचिवाल्याच्या जागेत मुलींची शाळा सुरू झाली. कालांतराने या सर्व शाळा केंद्र शाळेच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतर केंद्र शाळेच्या उजव्या बाजूला शिक्षण विभागांने नवीन इमारत बांधून पहिली ते चौथी शाळा सुरू केली. शिक्षणातील बदलानंतर पाचवीनंतरचे वर्ग माध्यमिककडे वर्ग झाले. सद्यस्थितीत मंद्रूप मध्ये झेडपीच्या सात शाळा कार्यरत आहेत.

मोडी भाषेचे रजिस्टर अजून 

1964 मध्ये जिल्हा परिषदेचे स्थापना झाल्यानंतर ही शाळा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे वर्ग झाली. गेल्या 50 वर्षात या शाळेत नामवंत शिक्षक घडले. त्यामध्ये बाळाप्पा म्हेत्रे, वि. म.  टेळे, हजारे , वाघमोडे, नवले, कुमठाळे, नागनाथ साठे, बंडगर, शेंडगे, हुलजंती आदी गुरुजींचा समावेश आहे. जुन्या काळातील विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड असलेले मोडी लिपीतील रजिस्टर शाळेने अजून जतन करून ठेवल्याचे मुख्याध्यापक प्रकाश कुंभार यांनी सांगितले. अलीकडे प्राथमिक शिक्षणात मोठा बदल झाला आहे. संगणक युगात शाळा कात टाकत असताना या मोठ्या केंद्रशाळेकडे मात्र जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. शाळेचे संगणकीकरण व तालुकास्तरीय मोठी प्रयोगशाळा या ठिकाणी व्हावी, अशी पालकांची मागणी आहे

सलगर गुरुजींना राष्ट्रपती पदक 

या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक स्व. सलगर गुरुजींना राष्ट्रपती पदक मिळाले होते. ते याच शाळेत शिकले व नंतर मुख्याध्यापक झाले. राष्ट्रपती पदक मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना काय हवे अशी विचारणा केली होती. त्यावर त्यांनी माझी शाळा व गावांसाठी काम करण्यासाठी सेवानिवृत्तीनंतरही संधी द्या अशी विनंती केली होती. प्रशासनाने ही विनंती मान्य केली व पाच वर्षे सलगर गुरुजींनी विनावेतन, विना मानधन शाळेसाठी काम केले. निवृत्तीनंतर काही वर्षांनी शिक्षण विभागाने त्यांना एक पत्र पाठवले होते. यातून अवमान झाल्याने त्यांनी राष्ट्रपती पदक शासनाला परत करण्याची घोषणा केली. सोलापूर “तरुण भारत’ने याची हेडलाइन केली होती. जिल्हा परिषद प्रशानाने याची दखल घेत ते पत्र तात्काळ मागे घेतले. असा आदर्श शिक्षक पुन्हा होणे नाही.