April 14, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

डॉ. बाबासाहेबांना माननारे जास्त; जाणनारे कमी झाल्याने चळवळ थंड़ावली : प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे

सोलापूर : कर्मचारी सेवक वर्ग, राजकारण, समाजकारण आणि साहित्य अशा सर्व विभागात उभी राहिलेली दलित चळवळ डॉ. बाबासाहेब आम्बेडकरी विचारांवर चालणारी विवेकवादी व लढाऊ चळवळ होती. दलित पैंथर ही एकाच वेळी राजकीय नेते आणि साहित्यिक घडविनारी चळवळ होती. रेल्वे, बीएसएनएल, पोस्ट , शिक्षक अशा सर्व सरकारी क्षेत्रातील मागासवर्गीय कर्मचार्यांच्या संघटनानी स्वताच्या पगारीतील पैसे ख़र्च करून संघटना उभ्या केल्या आणि वाढविल्या होत्या. ज्यानी दलितांच्या प्रश्नावर आवाज उठविला. पण अलिकडच्या काळात विद्यापीठ नामांतर आणि खैरलांजी प्रकरणानंतर आम्बेडकरी चळवळ ठंड़ावल्याचे दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे चळवळीत डॉ. बाबासाहेबांना माणनारे जास्त झालेत आणि जाणनारे कमी झालेत, अशी खंत लातूर येथील प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समिती सोलापूरच्यावतीने वसुंधरा महाविद्यालायात आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेतील “आंबेडकरी चळवळ: ऐतिहासिक वाटचाल, सद्यस्थिती, आव्हाने व पर्याय ” या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख होते तर समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, मनीष सुरवसे, प्रा. एम आर कांबळे हे विचारमंचावर उपस्थित होते.

ज. वि. पवार यांनी डॉ. आम्बेडकरोत्तर चळवळ यावर पाच खंड लिहिले. यावर प्रतिक्रिया देताना नामदेव ढसाळ यांनी आंबेडकरोत्तर वगैरे असे काही नसते. फक्त आंबेडक़रच असते, असे म्हटले होते. आंबेडकरी विचार हा सर्वकालीन विचार आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकेर यांच्या संघर्षापासून सुरु झाला आणि आजही ती सुरु आहे. रिपाई सुरु झाली आणि त्यातील भंडारे नावाचे लढवय्ये कार्यकर्ते कॉंग्रेस मध्ये गेले. चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्याला सोडून गेलेल्याचा राग धरण्या ऐवजी भंडारे यांनी बाजी मारली अशा शब्दात कौतुक केले. त्यानंतर रूपवते, बी. सी. काम्बले, दादासाहेब गायकवाड़ अशी फुटिरांची रांग लागली. विशेष म्हणजे त्यांचेही त्यांनी बाजी मारली असे कौतुक होत असतानाच दलितातील क्रांतिकारी कार्यकर्त्यांनी दलित पैंथर नावाची संघटना जन्माला घातली. तिचा इतका दबदबा होता की दलित विरोधी माणूस आंबेडकर चौकातुन पुढे जायला घाबरायचा. पुढे हिचा दबदबा संपला पण ती ही फुटली. नन्तर मा. कांशीराम यांनी बसपा उभी केली. 1989 ला ते राजीव गांधी या पंतप्रधानाच्य विरोधात अमेठीत लढले. ते हरल्यावर त्यांना विचारले गेले कि हरणार हे माहित असतानाही तुम्ही का लढले. तेव्हा ते म्हणाले की बापू के बच्चे के खिलाफ भी बाबा का बच्चा लड़ सकता है, ये मुझे कार्यकर्ताओं को दिखाना था! हा बाणा चळवळीतुन गेला आहे. व सारे शिलेदार धर्मान्ध शक्तीच्या बाजूने गेला आहे. कुणी थेट फडणवीस यांच्या सोबत तर कोण एकनाथ शिंदे यांच्या साथीने युतीत आहे. लॉन्ग मार्च काढनारे कवाड़ेही त्यांच्या सोबत मांडीला मांडी लाऊन आहेत आणि कविता लिहिणारे आठवलेही. थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की, धर्मान्ध शक्ती सत्तेतच येऊ नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे, सांगतात आणि आपल्या चळवळी नेमके उलटे करीत आहेत. वामन दादा कर्डक लिहितात की, भीम माझ्यात होता.. माझ्यातला भीम मीच केला ऊणा.. दोष देऊ कुणा.. अशी आजची अवस्था असून धर्मान्ध शाक्तिना रोखने हेच आंबेडकरी चळवळीपुढील मुख्य आव्हान असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी मान्यवर पाहुण्यांच्याहस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व स्वामी विवेकानंद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आले. प्रा. डॉ. सुहास उघडे यांनी प्रास्ताविक केले. मनीष सुरवसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीकृष्ण कोळी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत गायकवाड यांनी आभार मानले.यावेळी प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, शंकर पाटील, प्रा. अरुण सोनकांबळे, दत्ता थोरे, प्रा. सुवर्णा कांबळे, निजामोद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.