April 14, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर जिल्हा परिषदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; भीम गीतानी दणाणले सभागृह

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती सोलापूर जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांनी साजरी करणेत आली. विविध भिमगीतांनी सभागृह दणाणून गेले.

जिल्हा परिषदेचे आवारातील संविधान कोनशिलेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार, समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर यांचेहस्ते पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात दिप प्रज्वलन करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करणेत आले. भिम शाहिर संदिप शिंदे प्रबोधन मंच सोलापूर, सादरकर्ते प्रा. जिवन संदिप शिदे व संच यांनी भीम गीत गायन केले.

प्रारंभी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी संविधान उद्देशिका वाचन केले. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भारताची राजधानी हैद्राबाद येथे करा असे त्यावेळी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविले होते. बाबासाहेब यांचे जीवन चरित्रावर निलेश विमल धायरकर पुणे यांनी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. डाॅ. बाबासाहेब यांनी भाषावाद व प्रांतवाद होणार नाही याची काळजी घेतली. भारतीय रुपयाचे अवमुल्यन होत असल्याचे ग्रंथातून त्यांनी स्पष्ट केले असल्याचे व्याख्याते धायरकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्याचा व आंतरजातीय विवाह केलेले जोडप्यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार , समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे , उप मुख्य कार्यकारी सुर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी कादर शेख , कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण क्षिरसागर, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अधिक्षक गिरीष जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , रणजित घोडके, अभिमन्यु कांबळे , विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांचेसह सर्व खातेप्रमुख हे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रास्ताविक केले.

सर्व क्षेत्रात डॉ. बाबासाहेब यांचे योगदान

देशाच्या सर्व क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी योगदान दिले, असे मत जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. पण त्यांना आपण एका समाजापुरते सीमित केले असल्याची खंत व्यक्त करून परदेशात महिलांना मतदानाचा अधिकारी देणेसाठी १५० वर्षे लागली. परंतु भारतात स्वातंत्र्य मिळालेनंतर लगेच मदतानाचा महिलांना अधिकार मिळाला. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान असल्याचे सिईओ कुलदीप जंगम सांगितले.

शिक्षण वाघीणीचे दुध: अध्यक्ष वैद्य

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ते पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सर्व घटकांपर्यंत जिल्हा परिषेदेचे कार्य सुरू आहे. कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी जिल्हा परिषद घेत असल्याचे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सभापती संस्कृती सातपुते बोलताना म्हणाल्या की देशाला स्वातंत्र्यबरोबर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बील लिहिले. त्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून संघर्ष केला. जगात रक्तरंजित क्रांती झाल्या परंतू भारतात अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविणेसाठी प्रयत्न केले. महिलांना मतदानाचा अधिकार मिळणेसाठी  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. मराठी व इंग्रजी भाषणातून सभापती सातपुते यांनी बाबासाहेब यांचे कार्याची माहिती दिली. समाजकल्याण विभाग जिल्ह्यात विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

याप्रसंगी महिला व बाल कल्याण विभागाचे सभापती अॅड. अमृता वाघे यांनी मनोगत व्यक्त केले. यासाठी अधिक्षक सचिन सोनकांबळे, विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांनी प्रयत्न केले . या प्रसंगी कास्ट्राईब संघटनेचे वतीने उमाकांत राजगुरू, योगेश कटकधोंड, शंकर राठोड, धन्यकुनार राठोड यांना मान्यवरांचे हस्ते मिठाई वाटप केली. प्रारंभी कास्ट्राईब संघटनेच्या कार्यालयात मान्यवरांनी भेट देऊन जयंती निमित्त कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले तर कल्याण श्रावस्ती यांनी आभार मानले.