
सोलापूर : तुम्ही फेसबुक वापरत असाल आणि पोलीस अधिकाऱ्यांचे मित्र असाल तर सावधान! तुम्हाला फेसबुकवरून मनोज यादव किंवा अजित त्रिपुटे यांच्या अकाउंटवरून मेसेज येईल आणि सीआरपीएफ अधिकाऱ्याला मदत करा असे सांगितले जात असेल तर खबरदारी घ्या. या पोलीस अधिकाऱ्यांचे अकाउंट हॅक करून फसवणूक केली जात आहे.
पुणे विभागात ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील फेसबुक धारकांना धक्का देणाऱ्या घटना घडत आहेत. सध्या क्रिप्टो करन्सी व ओटीपी मागून ऑनलाइन फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघड झालेले आहेत. अशातच फेसबुकवरून मेसेज पाठवून फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यापूर्वी सोलापूर ग्रामीण मुख्यालयात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव व मंद्रूप पोलीस ठाण्यात काम केलेले तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. त्यांच्या फेसबुक मित्रांना हॅकर्स मेसेज पाठवून नंबर मागतात व त्यानंतर मी मीटिंगमध्ये आहे व्यस्त आहे, सीआरपीएफमध्ये माझा एक मित्र आहे, त्याची बदली झाली आहे, त्यामुळे त्याच्या घरातील साहित्य विकायचे आहे किंवा तुमच्याकडे ठेवून त्याला पैशाची मदत करा असे सांगितले जाते व त्यानंतर सीआरपीएफ संदीपकुमार नावाने तुम्हाला फोन येतो. विशेष धक्कादायक बाब म्हणजे हा फोन ट्रू कॉलरवरही फॉल्स दाखवत नाही. त्यामुळे तुमचा विश्वास बसतो. संदीपकुमार नावाने आलेल्या फोनवरील व्यक्ती तुम्हाला रक्कम देण्यासाठी स्कॅनर पाठवते आणि त्यावरून तुम्ही विश्वास ठेवून मदत केल्यास तुमच्या अकाउंटवरचे पैसे जातात किंवा फोन पे, गुगल पे, यूपीआयद्वारे पाठवलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकत नाहीत. याबाबत सायबर विभागाकडे ऑनलाइन तक्रार प्राप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे फसवणूक करणारे ही हॅकर्स मंडळी सातत्याने तुम्हाला फोन करीत राहतात. वेगवेगळ्या नंबरने त्यांचे फोन येत राहतात. फेसबुकवर अस्सल मराठीत मेसेज टाईप केला जातो आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांची नावे सांगून हॅकर्स हिंदीतून बोलतात. अशाच पद्धतीने मी दवाखान्यात ऍडमिट आहे, घरातील मंडळींना उपचारासाठी पैशाची गरज आहे असे मित्राचेही मेसेज येतात. असे मेसेज आल्यास संबंधित मित्राला तात्काळ फोन करून खातर जमा करावी.
जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे फेसबुकवरून येणाऱ्या मेसेज बाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.