
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात आमदार सुभाष देशमुख यांना धक्का देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तिऱ्हे येथील भारत जाधव यांनी भाजपचा त्याग करून आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून काँग्रेसमध्ये सन्मानपूर्वक प्रवेश दिला. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश आशापुरे शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते. भारत जाधव हे पूर्वी माजी आमदार दिलीप माने यांचे कार्यकर्ते होते. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे, पाकणी, शिवणी आदी दहा गावांच्या विकासासाठी पाच वर्षांपूर्वी त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याबरोबर काम सुरू केले. भाजपमध्ये जाऊनही ब्रह्मनिरास झाल्यामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव आघाडीवर चर्चेत आहे. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम करण्यासाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील दहा गावांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व कमी पडत होते. त्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाधव यांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू केले. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यावर जबाबदारी दिल्यावर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. भारत जाधव यांचा काँग्रेस प्रवेश आजी-माजी आमदारांसाठी धक्का मानला जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जाधव यांचा प्रवेश झाल्याने सुरेश हसापुरे यांचेही वजन वाढल्याचे दिसून येत असून भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, सिद्राम सलवदे, विनोद भोसले, सुदर्शन आवताडे, गणेश डोंगरे, भारत कराळे, सचिन गुंड, संदीप सुरवसे, सतीश पाटील, संजय खरटमल, मिनाज पटेल, प्रवीण फुलसागर, सुखदेव थोरात, हारून पटेल, गोवर्धन गावडे उपस्थित होते.