
सोलापूर : खासदार निधीतील सुचवलेली कामे घेताना झेडपीचे अधिकारी घोळ घालत आहेत, असा आरोप करीत तावा तावाने खासदार प्रणिती शिंदे या मंगळवारी जिल्हा परिषदेत आल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन त्यांनी ही कैफियत मांडल्याचे सांगितले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या महिन्यात डीपीसीची बैठक घेऊन मार्चअखेर मंजूर विकास कामाचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सर्व आमदार, खासदार यांच्याकडून कामाची यादी घेऊन वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या पीएची जिल्हा परिषदेत सध्या वर्दळ सुरू आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे हे जिल्हा परिषदेत आले होते.
खासदार प्रणिती शिंदे याही मंगळवारी जिल्हा परिषदेत आल्या. डीपीसीत मंजूर झालेली खासदार निधीतील कामे मंजूर करण्यात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून घोळ घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अक्कलकोट व मोहोळ येथील आपण सुचवलेल्या कामासाठी स्थानिक आमदारांच्या शिफारसपत्राची अधिकाऱ्यांकडून मागणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार निधीतून कामे सुचवलेली असतील तर आमदाराच्या शिफारस पत्राची गरजच काय? असा त्यांनी सवाल केला. कार्यकारी अभियंता खराडे यांनी डीपीसीत मंजूर झालेली आपली कामे बाजूला ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.