सोलापूर

पोस्टाने राखी पौर्णिमेबरोबरच बहिणीसाठी दिली ‘ही” सेवा

दोन लाख खाती केवायसीविना पडून

सोलापूर : आपल्या जिव्हाळ्याचे, आपल्या घरापर्यन्त येणारे पोस्टमन आणि जवळची पोस्ट ऑफिसेस महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी खुशखबर घेऊन आले आहेत ! राखी पौर्णिमेला पोस्ट खाते जसे बहिणींच्या राख्या भावाला पोहोचवण्यासाठी मोठी सेवा देते आता त्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना टपाल विभागामार्फत राबविली जात आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या ‘थेट लाभ हस्तांतरण’ (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1,500/- इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रुपये 2.50 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक पात्र महिलेच्या स्वत:च्या आधार संलग्न केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल.

महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफिसेस आणि सर्व पोस्टमन या महिलांचे आधार संलग्न बँक खाते उघडून देण्यास सिद्ध झाले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे हे ‘ थेट लाभ हस्तांतरण ’ (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खाते उघडल्यामुळे महिलांना सरकार मार्फत ‘थेट लाभ हस्तांतरण’ योजनेअंतर्गत नमूद केलेल्या सर्वच योजनांचे लाभ मिळू शकतील. यासाठी महिलांनी स्वत: जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये केवळ आपले आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे ‘थेट लाभ हस्तांतरण’ (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खाते उघडल्यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यास मदत होईल. यामुळे कुटुंबांमधील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत होऊन त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी देखील यांचा फायदा होणार आहे.

महिलांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा पोस्टमन बरोबर संपर्क साधून आपले हे खाते उघडून घ्यावे आणि या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीची पूर्तता करावी असे आवाहन सोलापुर विभागाचे प्रवर अधीक्षक के. नरेन्दर बाबु यांनी केले आहे.

तसेच या बरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये आतापर्यंत उघडल्या गेलेल्या 4.5 लाख खात्यांपैकी सुमारे 2 लाख खाती आधार संलग्न झालेली नसल्यामुळे सरकारी योजनांचे फायदे या खात्यांना मिळू शकत नाहीत. ज्या खातेधारकांनी अद्याप आधार क्रमांक संलग्न केला नसेल अशा सर्व खातेदारांनी देखील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा पोस्टमन बरोबर संपर्क साधून आपले इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये उघडलेले खाते आधार संलग्न करून घ्यावे असेही आवाहन सोलापुर विभागाचे प्रवर अधीक्षक के. नरेन्दर बाबु यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button